DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️ प्रतिनिधी – शांताराम दुनबळे नाशिक/घोटी : खदानीच्या जागेत असलेल्या पाण्यामध्ये कपडे धुण्यासाठी गेलेल्या ४० वर्षीय महिलेच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. ही घटना इगतपुरीतल्या खंबाळे गावातील विश्रामगृहाच्या बाजूला असलेल्या खदानीत घडली. या घटनेमुळे ग्रामस्थांसह महिलेच्या नातेवाइकांनी आक्रोश करून पोलिस ठाण्याला घेराव घातला. महिलेवर तिघांनी अत्याचार करून खून केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. शवविच्छेदनानंतर ‘व्हिसेरा’ राखून ठेवण्यात आला असून, घोटी पोलिस तपास करीत आहेत.
इगतपुरी तालुक्यातील खंबाळे येथे असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहाजवळ खदानीचे काम सुरू आहे. या परिसरात शेती करणाऱ्या चौधरी कुटुंबातील एक महिला सकाळी दहाच्या सुमारास कपडे धुण्यासाठी गेली. दुपारी बराच वेळ होऊनही महिला घरी न परतल्याने नातेवाइकांनी शोध घेतला. खदानीत दगडांच्या खाचेत महिलेचा मृतदेह पाहून नातेवाइकांनी आक्रोश केला. घटनेची माहिती मिळताच घोटी पोलिसांनी धाव घेत पंचनामा करून मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठवला. स्थानिक राजकीय नेत्यांनीही पोलिस ठाण्यात धाव घेतली. शेकडो ग्रामस्थ पोलिस ठाण्यात दाखल होत त्वरित संशयितांना अटक करण्याची मागणी केली. या ठिकाणी मद्यपींचा वावर वाढला असून, गुन्हेगारी कृत्य वाढत असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून, इतरांचा शोध सुरू आहे.
दरम्यान, शवविच्छेदनात महिलेवर अत्याचार झाल्याचे समोर न आल्याचे जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, सखोल तपासाकरिता ‘व्हिसेरा’ राखून ठेवण्यात आला. गावात सायंकाळी तणाव वाढल्याने पोलिस अधीक्षकांसह अधिकची कुमक दाखल झाली. त्यांनी ग्रामस्थांची समजूत काढत तपासासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर ग्रामस्थांचा रोष काहीसा निवळला. घोटीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप खेडकर यांच्याविषयीही ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.