अंबड व गुन्हे शाखेच्या पोलिसांची मोखाडा येथे कारवाई
DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- योगेश गवळे
नाशिकः अंबड गावातील मयूर केशव दातीर (फडोळ मळा, अंबड) या युवकाच्या खून प्रकरणातील आरोपी करण अण्णा कडूसकर (वय २१), मुकेश अनिल मगर (वय २५), रविंद्र शांताराम आहेर (वय २८) यांना २४ तासाच्या आत जेरबंद करण्यात आले आहे. अंबड तसेच गुन्हे शाखेच्या पथकाने मोखाडा (जि. पालघर) येथे केलेल्या संयुक्त कारवाईत तिघे आरोपी पोलिसांच्या हाती लागले.
याबाबतचे अधिक वृत्त असे की, गुरूवारी दुपारी अंबड गावातील महालक्ष्मी नगरमधील हनुमान मंदिराजवळ ही घटना घडली होती. दारू पिण्यासाठी पैसे मागण्यावरून वाद झाला. या वादाचे पर्यावसन प्राणघातक हल्ल्यात झाले. करण कडुसकर, रवी आहेर, मुकेश मगर यांनी धारदार शस्त्राने मयूर दातीर याच्या छाती व पोटावर वार केले. हे घाव वर्मी बसल्याने मयूरचा जागीच मृत्यू झाला. यातील करण कडुसकर याच्यावर खून, घरफोडी सह १८ गुन्हे दाखल आहेत. तर मुकेश मगर याला हद्दपार करून अहमदनगर जिल्ह्यात सोडण्यात आले होते.
या घटनेचे वृत्त समजताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे, शेखर देशमुख, अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रमोद वाघ यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपासास प्रारंभ केला होता.
मारेकऱ्यांना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेत अंबडवासियांनी पोलीस ठाण्यात ठिय्या दिला होता. आरोपींचा माग काढत असताना ते घटनेनंतर त्र्यंबकेश्वर मार्गे मोखाडा येथे गेल्याची माहिती मिळताच अंबड व गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्तपणे कारवाई करत तिघांना ताब्यात घेतले आहे.