जळगावच्या महिला जेल रक्षकच झाल्या भक्षक दोन हजाराची लाच घेताना एसीबीने सुभेदारासह पकडले
DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- गुलाबराव भदाने
धुळे:- न्यायालयीन कोठडीत असलेल्या मुलाची भेट घडवून आणण्यासाठी प्रत्येक वेळी दोन हजाराची मागणी करणार्या जळगाव जिल्हा कारागृहातील कर्मचार्यांना दि.08/11/2023 रोजी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. याप्रकरणी जळगाव जिल्हा कारागृहातील सुभेदार भिमा उखडु भिल तसेच महिला कारागृह पोलीस पुजा सोपान सोनवणे व हेमलता गयबु पाटील यांनी तक्रारदार यांचेकडून दोन हजाराची लाचेची मागणी करुन सदर लाचेची रक्कम महिला कारागृह पोलीस हेमलता पाटील यांचे हस्ते स्विकारतानां रंगेहाथ पकडल्याने त्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
यासंदर्भात सविस्तर वृत्त असे, तक्रारदार एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत असलेल्या पहुर येथे अंगणवाडी शिक्षिका आहेत. त्यांच्या मुला विरुध्द जळगांव येथील जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात कलम 307 प्रमाण गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हयांत त्यास अटक करण्यात येवून तो सध्या जळगाव जिल्हा कारागृह येथे न्यायालयीन कोठडीत आहे.
तक्रारदार त्याच्या मुलास वेळोवेळी भेटण्याकरीता, जळगाव जिल्हा कारागृहात गेले असता तेव्हा तेथे ड्युटीवर असलेले सुभेदार भिमा भिल, कारागृह पोलीस पुजा सोनवणे, हेमलता पाटील, अनंत केंद्रेकर व परशुराम काळे तसेच वेळोवेळी ड्युटीवरील इतर कर्मचारी हे त्यांच्याकडून त्यांच्या मुलाची भेट घडवून आणण्यासाठी प्रत्येक वेळी दोन हजाराची मागणी करीत असत. तक्रारदार यांची पैसे देण्याइतकी आर्थिक परिस्थिती नसल्याने त्यांनी 7 नोव्हेंबर 2023 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे यांचेकडे तक्रार दिली होती. त्या अनुषंगाने धुळे एसीबीने आज जळगाव जिल्हा कारागृह येथे जावून पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान महिला कारागृह पोलीस पुजा सोनवणे व हेमलता पाटील यांनी तक्रारदार यांचेकडे त्यांच्या मुलाची कारागृहात भेट करुन देण्यासाठी दोन हजार लाचेची मागणी करुन सुभेदार भिमा उखडु भिल यांनी तक्रारदार यांना सदर लाचेची रक्कम महिला कारागृह पोलीस हेमलता पाटील यांच्याकडे देण्यास सांगितले. महिला कारागृह पोलीस हेमलता पाटील यांना लाचेची रक्कम स्वीकारताना एसीबीने रंगेहात पकडले. लाचखोरांविरुध्द जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कलमान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी तसेच पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे, रामदास बारेला, संतोष पावरा, मकरंद पाटील, प्रशांत बागुल, प्रविण मोरे, प्रविण पाटील, सुधीर मोरे या पथकाने केली आहे. सदर कारवाईस नाशिक लाचलुचपत प्रतिबंघक विभाग,नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेडूडी व वाचक पोलीस अधीक्षक नरेंद्र पवार यांचे मार्गदर्शन लाभले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे.