DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी – बाळासाहेब सोनवणे
नाशिकः नाशिक जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे कारवाईंच्या बाबतीत दहशत असताना देखील तालुका पोलीस ठाणे नाशिक ग्रामीण येथील पोलीस हवालदाराला लाचेची लालच सुटली आणि त्याची विकेट पडली.
विल्होळी पोलीस चौकी येथे जमा असलेला ट्रक सोडण्यासाठी ३५ हजार रुपयाची लाच प्रकरणात पोलीस हवालदार रविंद्र बाळासाहेब मल्ले व खासगी इसम तरुण मोहन तोडी यांच्या विरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यान्वये लाच लुचपत प्रतिबंध विभागाने कारवाई केली आहे. या कारवाईबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांचा विल्होळी पोलीस चौकी येथे जमा असलेला ट्रक सोडण्यासाठी पोलीस हवालदार रविंद्र बाळासाहेब मल्ले याने एक लाख रुपये लाचेची मागणी केली. त्यानंतर तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक कार्यालयात त्याबाबत तक्रार दिली.
या तक्रारीवरुन ला.प्र.वि. नाशिक पथकाने पडताळणी करून सापळा आयोजीत केला असता सापळा कारवाई दरम्यान आलोसे रविंद्र बाळासाहेब मल्ले, पोलीस हवालदार (नेमणूक तालुका पो. ठाणे, नाशिक ग्रामिण) यांनी तक्रारदार यांचे कडे एक लाख रुपये लाचेची मागणी केली व तडजोडअंती ७० हजार लाचेची मागणी करून पहिले ३५ हजार रुपये रक्कम खाजगी इसम तरुण मोहन तोंडी, व्यवसाय ट्रान्सपोर्ट, रा. पंचवटी नाशिक यांचेकडे देण्यास सांगितले.
६ नोव्हेंबर रोजी तरुण मोहन तोंडी यांनी ३५ हजार रुपये लाचेची रक्कम ओम नागपुर ट्रान्सपोर्ट, हिरावाडी, नाशिक येथे स्विकारल्याने त्यांना पकडण्यात आले. त्यानंतर दोघांविरुध्द पंचवटी पोलीस ठाणे, नाशिक शहर गु.र.नं. ५२२/२०२३, भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७, १२ प्रमाणे दि. ७ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर, पोलीस अधिक्षक ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक व माधव रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली असुन पुढील तपास नितीन पाटील, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि, नाशिक करीत आहे.