जी रिकामी डोकी आपल्या आसपास वावरत असतात त्यांच्या हाती जर हे खेळणे लागले तर भविष्यात याची व्याप्ती अधिक वाढून त्याचा परिपाक सामाजिक अशांतता निर्माण होण्यात होईल.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच “डीपफेक” तंत्रज्ञांनाबद्दल चिंता व्यक्त केल्याच्या बातम्या आल्या. त्याआधी प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री राश्मिका मंदाना चा डीपफेक व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाला आणि एकच खळबळ उडाली. आंबटशौकिनांना त्यानिमित्ताने काही खाद्य मिळाले आणि तो विषय बराच चघळला देखील गेला. हिंदी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री कतरिना कैफ हिची देखील अनावृत्त शरीराची चित्रफीत अशीच पसरवली गेली मात्र वेळीच लक्षात आल्याने त्याविरोधात पाऊले उचलली गेली आणि समाज माध्यमांवर अधिक प्रमाणात पोहोचण्याआधी त्या चित्रफितीला आळा घालण्यात आला. बर! हे प्रकरण काही भारतापुरतेच मर्यादित नाही. अगदी बराक ओबामा यांना देखील या नव्या तंत्रज्ञानाच्या गैरवापराचा फटका बसला आहे. इतकेच नव्हे तर जर्मनीत एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या आवाजाचा या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वापर करून पैसे उकळल्याच्या देखील घटना घडल्या आहेत. तेच स्थानिक ते जागतिक अशा सर्व स्तरावर हा विषय चिंतेचा ठरला आहे आणि त्याविषयी उलटसुलट चर्चा सुरु आहेत.
भारतात आजवर जी प्रकरणे समोर आली आहेत त्यामध्ये महिलांना लक्ष्य करण्यात आले आहे . स्त्रियांच्या बाबतीत होणारे सायबर गुन्हे काही नवीन नाहीत. आधीच त्याचा मोठा त्रास महिलांना सहन करावा लागतो. त्यात आता या नव्या प्रकारची भर पडली आहे. प्रथम ज्या अभिनेत्रींच्या बाबतीत या घटना घडल्या त्याचा त्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. हे निश्चित! मात्र अशा घटनांना कणखरपणे सामोरे जाण्याची त्यांची कृती अधिक काही सांगून जाणारी आहे. या अभिनेत्री प्रसिद्ध असल्याने त्यांच्या तक्रारींची लगेच दखल घेतली गेली. मात्र अशीच वेगवान कारवाई सामान्य महिलांच्या बाबतीत होईल का? हा खरा प्रश्न आहे. मात्र यानिमित्ताने समाजात यासंदर्भात नक्की काही जागृती येईल हे नक्की! तेव्हा या असल्या अभद्र प्रकाराला नक्की कसे सामोरे जायचे याची चर्चा खूप झाली. त्यातून काही तरी धडा सर्वानीच घ्यावा ही अपेक्षा.
हे “डीपफेक” तंत्रज्ञान काय आहे? तर कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून एखाद्या व्यक्तीचा चेहरा, संपूर्ण शरीर, आवाज अशा सर्व गोष्टी कृत्रिमरित्या एकत्र आणून हुबेहूब त्या व्यक्तीचा भास निर्माण केला जाऊ शकतो. आजवर खोटे फोटो, काटछाट करून बनवलेल्या चित्रफिती आपल्याला माहिती आहेतच. त्याचे हे पुढचे पाऊल म्हणजे “डीपफेक” तंत्रज्ञान होय. शिवाय हे सर्व करण्यासाठी फार काही कौशल्य लागते असेही नाही. यासाठी काही सॉफ्टवेअर टूल्स सहज उपलब्ध आहेत. जी रिकामी डोकी आपल्या आसपास वावरत असतात त्यांच्या हाती जर हे खेळणे लागले तर भविष्यात याची व्याप्ती अधिक वाढून त्याचा परिपाक सामाजिक अशांतता निर्माण होण्यात होईल. याविषयी गंभीरपणे विचार करून कृती करण्याची वेळ आली आहे. अन्यथा नंतर वेळ निघून गेली असेल आणि व्हायचे ते नुकसान झालेले असेल.
समाज माध्यमांचे अल्गोरिदम हे ज्या गोष्टीकडे गर्दीचा अधिक कल असेल ते दाखवण्याकडे असतो. जेव्हा समाजात असल्या गोष्टी अधिक प्रमाणात पहिल्या जातील, पुढे पाठवल्या जातील तेवढ्या अधिक प्रमाणात ते दाखवले जाईल. इथे चांगल्या चित्रफितीची व्याख्या काय आहे तर जे मोठ्या प्रमाणात बघितलं जाईल ती चित्रफीत चांगली! तेव्हा जर बदनामीच्या हेतूने या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने चित्रफिती पसरवल्या गेल्या तर त्यावर कुणाचेच नियंत्रण असत नाही. सरकार या बाबतीत अनेक कारवाया करतांना दिसते. परंतु तंत्रज्ञानाचा वेग इतका अधिक असतो की तत्काळ त्याविरोधात कृती केली नाही तर मोठे नुकसान होऊ शकते.
“डीपफेक” तंत्रज्ञानाला अटकाव करण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत निश्चितपणे आणि अधिक वेगाने होऊ शकते. मात्र जर समाज म्हणून आपणच सामुहिकपणे ‘विवेक’ दाखवला तर या प्रकाराला आपण अधिक चांगल्या प्रकारे सामोरे जाऊ शकतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या प्रकाराला बळी पडणाऱ्या व्यक्तीला आपण कसे सावरू शकतो तो पैलू सर्वात अधिक प्रकाशात आणला जायला हवा. बऱ्याचदा अशा घटनांवर आपली प्रतिक्रिया कशी असते यांवर हे अवलंबून असते. त्यासाठी आता समुपदेशक, स्वयंसेवी संस्था, सरकारी संस्था, कार्यकर्ते यांची साखळी आणि परस्पर सहकार्य अधिक मजबूत केले पाहिजे. विशेषत: महिलांच्या बाबतीत जेव्हा या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो त्यामागचा उद्देश हा “मानसिक हानी” करणे हा असतो. अशावेळी जर तो उद्देश सफल होणार नाही यासाठी सुद्धा प्रयत्न तितकेच आवश्यक ठरतात.
आधी नमूद केल्याप्रमाणे स्त्रियांच्या देहाचा वापर करणे हा कितीही वाईट असला तरी एक भाग झाला पण त्यापलीकडे निवडणुकांत जर असल्या तंत्रज्ञानाचा वापर झाला तर त्याचा किती वाईट परिणाम होईल याची कल्पना केलेलीच बरी! तेव्हा या सर्व प्रकाराला अटकाव होणे ही आपल्या समाजस्वास्थ्याच्या दृष्टीने प्राधान्यक्रमाची बाब ठरते.