नवे संकल्प, नवे उन्मेष, नव्या आशा घेऊन उंबरठ्यावर आलेली लक्ष लक्ष दिव्यांची ही दीपावली!
२०२३ हे वर्ष परस्परविरोधी घटनांमुळे आपल्या सर्वांच्या कायमच स्मरणात राहणारे वर्ष आहे. एकीकडे संसदेत महिला आरक्षणाविषयी चर्चा सुरू आहेत तर मणिपूर येथे घडलेल्या महिलावरील अमानुष अत्याचारांच्या घटना घडत आहेत. मुळात ह्या घटना घडूच नयेत यासाठी पावलं उचलली जायला हवीत. त्यातली अत्यंत महत्त्वाची आणि अगत्याने नोंदवावी अशी घटना म्हणजे भारताच्या चांद्रयानाची. चंद्रयान-३ च्या मोहिमेचा भाग असलेले “विक्रम” चंद्राच्या पृष्ठभागावर अलगदपणे अवतरीत झाले आणि समस्त भारतीयांनी एकच जल्लोष केला. या घटनेमुळे प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने साऱ्या जगात उंचावली गेली, रशिया, अमेरिका, चीननंतर भारतातील इस्रोचे चांद्रयान यशस्वीरीत्या चंद्रावर उतरले. तंत्रज्ञानाच्या किमयेने मानव आपल्या सीमा विस्तारतो आहे त्याचे हे एक सकारात्मक उदाहरण म्हणता येईल. तर दुसरी घटना इस्रायल पॅलेस्टिनी यांच्यात सुरू असलेल्या युद्धाची. ही घटना एकीकडे मनाला विषण्ण करून सोडते त्याचबरोबर आपल्या संवेदनशील असलेल्या मनात करुणा जागवणारीही आहे. एकीकडे असंख्य लोक निर्वासित होत आहेत. निष्पाप लोकांचे निष्कारण जाणारे बळी, तिथल्या मुलांच्याहालअपेष्टा यासंबंधीच्या काळीज हलवून टाकणाऱ्या बातम्या आपल्यापर्यंत येतात. या बातम्या ऐकून / वाचून हळहळण्या पलीकडे आपल्या हातात काही नसते. या सगळ्यामध्ये सर्वात जास्त नुकसान होते ते लहान मुलांचे. युद्धासारख्या भयानक गोष्टीमुळे स्वतःचे उद्ध्वस्त झालेले कुटुंब पाहून कसं भावविश्व तयार होईल या मुलांचं? युद्धामुळे सामान्य माणसाचे नुकसानच होत आलेले आहे. आता तरी ही युद्धं थांबायला हवीत हा आशावाद फक्त आपण बाळगू शकतो. त्या आशावादाला धरूनच आपण पुढे जात राहतो.
वृत्तपत्रासारख्या माध्यमातून राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक भाष्य करताना वास्तवाचे भान राखावेच लागते. इतकेच नव्हे, तर वर्तमानाचे भान राखताना, भविष्याचा वेध घेणे आवश्यक ठरते. पुढील वर्ष स्थानिक स्वराज्य संस्था आणि महत्त्वाच्या अशा लोकसभा व विधानसभा निवडणुकांचे असणार आहे. सध्या तर आपण स्वातंत्र्याचा अमृत काळ साजरा करीत आहोत. तेव्हा सातत्याने काही तरी अनोखे असे सतत सुरु आहे. जे सुरु आहे ती सुरुवात देखील नाही आणि अंत देखील नाही. हा एक प्रवास आहे जो आपण जन्मापासून अनुभवत असतो. जगातल्या प्रत्येक गोष्टीचा कोणत्या ना कोणत्या प्रकारचा प्रवास हा अविरत सुरूच असतो. कुठूनतरी सुरुवात होऊन कुठेतरी पोहचण्याचा प्रवास. आपण मानसिक, शारिरिक अशा वेगवेगळ्या पातळ्यांवर सतत हा प्रवास अनुभवत असतो. अपेक्षीत किंवा अगदी अनपेक्षित वळणावर नेऊन पोहचवणारा प्रवास. दरम्यान काहीतरी निसटून गेल्याची हुरहूर लावणारा किंवा अचानक, अकल्पित काहीतरी गवसल्याचा प्रवास. प्रवाहाप्रमाणे वाहत जाऊन झालेला प्रवास असो किंवा प्रवाहाविरुद्ध केलेला खडतर प्रवास. आपण ज्या जगात राहतोय त्या जगाचा प्रवास कोणत्या दिशेला चालला आहे हे आपण पाहतोच आहोत. आज तिशीच्या पुढे असणारे सर्वजण, जगात गेल्या काही दशकात घडलेल्या मोठमोठ्या बदलांचे साक्षीदार आहेत. पावसाचे वेळापत्रक बिघडल्यामुळे शेतकरी खरीप पिकांना मुकला आहे हे स्पष्टच आहे. आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची जास्त गरज आहे. ‘नेमेचि येतो दुष्काळ’ असे म्हणणे क्रूरपणाचे ठरेल. कधी नव्हते एवढे तंत्रज्ञान आज विकसित झालेले आहे आणि आर्टिफिशियल इंटेलिजंसमुळे तर अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. आता तंत्रज्ञानाचा यापुढचा प्रवास कोणत्या दिशेने जाईल हे येणाऱ्या काळात समजेलच..
युवा काय नी वृद्ध काय, सगळ्यात अतिशय वाढलेला मोबाईल स्क्रिनटाईम, ढासळलेली जागतिक अर्थव्यवस्था, ग्लोबल वार्मिंग आणि ललित पाटील या अमली पदार्थ तस्कराच्या प्रकरणाने आपल्या महाराष्ट्राभोवती अमली पदार्थांचा विळखा किती गंभीर रूप धारण करतो आहे हे आपण पाहिलेच. आता तर सरकारी कर्मचारी लाचखोरी च्या साऱ्या सीमा पार तोडून “कोटीच्या कोटी उड्डाणे” घेतांना दिसत आहेत. गायकवाड-वाघ या दुकलीने ही किमया करून दाखवली आहे. तेव्हा यासारख्या समस्यांना तोंड देण्यासाठी ‘आशावाद’ जिवंत ठेवावाच लागणार आहे. राजकारणाचा स्तर दिवसेंदिवस घसरतांना आपण मुकाट्याने बघत आहोत. मतदार राजाची परीक्षा आता पाच राज्यांच्या निवडणुकात आहेच त्यानंतर महाराष्ट्रात देखील निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाईल. तेव्हा मतदारांची खरी कसोटी असेल.
या संमिश्र अनुभव देणाऱ्या घटना मनावर कोरल्या जात असताना नवे संकल्प, नवे उन्मेष, नव्या आशा घेऊन उंबरठ्यावर आलेली लक्ष लक्ष दिव्यांची ही दीपावली! आपल्या आयुष्याचे सर्व अंधारे कोपरेही प्रकाशमान व्हावेत आणि आसमंत दिव्यांच्या प्रकाशाने न्हावून निघावा अशी मनोकामना घेऊन साजरा होणारा हा दिव्यांचा सण म्हणजे दिवाळी!
त्यानिमित्ताने दर्शन पोलिस टाईम च्या घोडदौडीत बहुमोल योगदान देणारे सर्वात मुख्य म्हणजे आमचे वाचक तसेच जाहिरातदार आणि आमचे सर्व वार्ताहर, लेखक, कवी, मुद्रक, वितरक, आमचा संपूर्ण कर्मचारी वर्ग आणि कुटुंब यांचे मनःपूर्वक आभार. ही दिवाळी आणि नवीन वर्ष आपल्या सर्वांसाठी सकारात्मकता, आरोग्य, संपदा घेऊन येवो. शांततापूर्ण, सुंदर नवीन युगाकडे जगाचा प्रवास सुरू राहो.
मन:पूर्वक शुभेच्छा.