पो. नि. ओमकांत चिंचोलकर यांची कार्यवाही
DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️ प्रतिनिधी:- काकडे सुहास कुमार
नांदेड / लोहा :- लोहा शहर परिसरात मागील अनेक दिवसांपासून मटका, गुडगुडी, पत्यांचे क्लब, गुटखा, अनधिकृत मांस विक्री, अवैध रेती उपसा व वाहतूक आदी अनधिकृत व्यवसाय राजरोसपणे चालत होते. नागरिकांच्या भावना लक्षात घेवून व शहरातील अनधिकृत व्यवसाय बंद करण्यासाठी लोहा पोलिसांनी चांगलीच कंबर कसली असून मागील तीन दिवसांपासून विविध अवैध धंद्यावर कार्यवाहीचे धाडसत्र सुरू असून अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
लोहा शहर परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तसेच पोलिस ठाणे हद्दीत सुरू असलेले गैर कारभारावर अंकुश लावण्यासाठी पोलिसांनी एक कदम पुढे टाकले असून प्रारंभीच्या काळात त्यांनी रस्त्यावरील अनधिकृत स्टॉल हटवून रस्ता मोकळा केला. त्यानंतर अनधिकृत दारू विक्री वर प्रतिबंध केल्यानंतर आता इतर पत्ते क्लब, मटका, गुडगुडी व्यवसाय बंद करून दि. २७ रोजी सोमवारी संपूर्ण राज्यात शासन बंदी आदेश लागू असताना गुटखा विक्री करणाऱ्या शहरातील आठ पान ठेल्यावर कार्यवाही करत जवळपास १० हजार ९२६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दि. २८ रोजी मंगळवारी ठराविक ठिकाणी मांस विक्री न करता अनधिकृतरीत्या इतरत्र सार्वजनिक ठिकाणी मांस विक्री करणाऱ्या नऊ जणा विरुद्ध कायदेशीर कार्यवाही करण्यात आली.
सदरील दबंग कार्यवाहीने अनधिकृत व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. सदर कार्यवाहीत सपोनि सूर्यप्रकाश चन्ना, पो उप नि मारोती सोनकांबळे, मंगेश नाईक, हलसे, आदींसह पोलिस कर्मचाऱ्यांच्या समावेश होता.
लोहा पोलिस ठाणे हद्दीत कायदा व सुव्यवस्था बिघडेल आणि त्याचा परिणाम सर्वसामान्यांवर होईल असे कुठलेही अनधिकृत धंदे अथवा व्यवसाय चालू देणार नाही. पो. नि. ओमकांत चिंचोलकर (पोलिस ठाणे) लोहा यांनी सांगितले