गुन्हे शाखेची पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांची धडक कारवाई, एकास अटक
DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- संदिप अहिरे
धुळे : धुळे शहरात पोलीस अधीक्षक म्हणून श्रीकांत धिवरे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कारवायांची धडाका मोहीमच सुरू केली आहे. त्यात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी देखील आपल्या कारवायांची गती अधिक वाढवली आहे. शहरातील १०० फुटी रस्त्यावर एका पत्र्याच्या शेड मध्ये साधारण पत्रे तयार करून जिंदाल कंपनीचा बनावट शिक्का मारून त्याची विक्री करण्यात येत होती. ही बनावटगिरी स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी रात्री छापा मारल्यानंतर उघडकीस आली. या ठिकाणाहून पोलिसांनी पत्रे, सिलिंगचे अन्य साहित्य तयार करण्याचे मशीन आणि बनावट शिक्के असा एकूण २४ लाख ३२ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. तसेच मुख्तार खान शहजाद खान (२९) या तरुणाला अटक केल्याची माहिती पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शहरातील शंभर फुटी रोड भागात स्मार्ट स्टील या दुकानांमध्ये साधारण पत्रे आणि सिलिंगचे साहित्य तयार करून त्यावर एका प्रतिष्ठित जिंदाल कंपनीचा शिक्का वापरून ते बनावट पत्रे कंपनीच्या नावाने विकले जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळाली. त्यानुसार रविवारी रात्री पोलिसांच्या पथकाने त्याठिकाणी छापा टाकला. तेव्हा त्याठिकाणी मुख्तार खान शहजाद खान (वय २९, गरीब नवाज नगर, सार्वजनिक हॉस्पिटलजवळ, धुळे) हा तरुण एका मशीनद्वारे साधारण पत्रे तयार करून त्यावर निलकमल कंपनीच्या प्रिंटरने जिंदाल कंपनीचा बनावट शिक्का मारून ते बाजारात विक्री करीत होता. त्याच्याकडे जिंदाल नावाच्या शिक्का वापरण्याचा कोणताही अधिकृत परवाना नव्हता. अधिक चौकशी केली असता जिंदाल या कंपनीचे स्टिल क्षेत्रात नाव प्रसिद्ध (ब्रँडेड) असल्याने सदर नावाने हे बनावट पत्र्यांची आणि सिलिंगच्या अन्य साहित्याची विक्री केली जात असल्याचे उघडकीस आले.
दुकानातून लहान मोठ्या आकाराचा पत्रा, पत्र्याचे गोलाकार गाळे, सिलिंग पट्टा तयार करण्याचे मशीन आणि पत्रे असा एकूण २४ लाख ३२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संशयित आरोपी मुख्तार खान शहजाद खान याच्या विराेधात चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात भादंवि कलम ४१९, ४२० प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली. सदरची कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दत्ता शिंदे आणि चाळीसगाव रोड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धीरज महाजन आणि पोलिसांच्या पथकाने कारवाई केली.