DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- अकिल शहा
साक्री : मेंढपाळ ठेलारी (धनगर) समाजाला भटक्या जमाती ब (एन टी-ब) प्रवर्गातून भटक्या जमाती (क) प्रवर्गात समाविष्ट करून घेण्याबाबतचे निवेदन मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांना मेंढपाळ ठेलारी समाजाच्या वतीने पद्मश्री माजी खासदार डॉ. विकास महात्मे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. यावेळी मेंढपाळ ठेलारी समाजाचे नेते तथा ग्रामपंचायत महीर ता.साक्री चे सरपंच रमेशभाऊ सरक, उत्तर महाराष्ट्र मेंढपाळ ठेलारी (धनगर) समाज संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठलभाऊ मारनर(अंबापूर ता.साक्री) उपस्थित होते. निवेदनात नमूद केले आहे की, मेंढपाळ ठेलारी ही जात मूळ धनगर समाजाची पोट जात म्हणून ओळखली जाते. परंतु सद्या ती विमुक्त जाती भटक्या जमाती व एन टी ब प्रवर्गात असल्यामुळे मेंढपाळ ठेलारी समाजाला धनगर समाजाचे एन टी क मधील योजनांचे लाभ मिळत नाहीत. वास्तविक पाहता मागासवर्गीय आयोगाने त्यांच्या अहवालात मेंढपाळ ठेलारी ही धनगर समाजाची पोट जात असल्याचा स्पष्ट निर्वाळा दिलेला आहे. त्यामुळे एन टी क प्रवर्गात त्यांचा समावेश करणे अगत्याचे आहे तरीही आपल्या स्तरावरून मेंढपाळ ठेलारी समाजाला एन टी क प्रवर्गात समाविष्ट करण्याची तातडीने नियमानुसार कार्यवाही करण्यात यावी. जेणेकरून धनगर समाजाला मिळणाऱ्या योजनांच्या लाभापासून मेंढपाळ ठेलारी समाज वंचित राहणार नाही. शासनाकडून त्यासंबंधी तात्काळ आदेश निर्गमित करण्यात यावेत. असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने महाराष्ट्र शासन हे सदैव वंचित घटकांच्या पाठीशी असल्यामुळे हा विषय लवकरात लवकर मार्गी लावून मेंढपाळ ठेलारी समाजाचा एन टी क प्रवर्गात निश्चित समावेश करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले आहे.