DPT NEWS NETWORK 🗞️✍️
सांगली प्रतिनिधी:- रमजान मुलानी
मिरज : मिरज मध्ये शहर पोलिसांनी १९ कोटी १७ लाख वीस हजार रुपये किंमतीचा व्हेल माशाच्या उलटीचा साठा जप्त केला. तीन जणांना अटक केली. याप्रकरणी बडा मासा कोण आहे याचा शोध पोलीस घेतील असा विश्वास पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सांगितले.
याबाबत अधिक माहिती अशी की, मिरजेतील म्हैसाळ रोडवरील वांडरे ट्रेडर्स कॉर्नर परिसरात दोन व्यक्ती व्हेल माशाच्या उलटीचा (अंबर ग्रीस) साठा घेऊन तस्करी आणि विक्रीच्या उद्देशाने येणार असल्याची माहिती मिरज शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला कळाले. पथकाने मध्यरात्री अडीचच्या सुमारास वांडरे कॉर्नर आणि महात्मा फुले चौक दरम्यान सापळा रचला. हिरा हॉटेल चौकाकडून म्हैसाळ रोडवरील वांडरे कॉर्नरच्या दिशेने एम. एच. १० डी.पी. ९७०८ क्रमांकची मोपेड वरून दोघेजण येणार असल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांचे पथक आणि वन विभागाचे अधिकारी यांनी मध्यरात्री सापळा लावला. वांडरे कॉर्नर जवळ एम. एच.०७ ए . एस ०११७ क्रमांकाची चार चाकी गाडी आणि मोपेड या ठिकाणी आली. पोलिसांच्या सापळ्यात सापडली. पोलिसांनी दोन्ही वाहने ताब्यात घेतली. व्हेल माशाच्या उलटीचा (अंबर ग्रीस) चार लाद्यांच्या स्वरूपात असलेला साठा जप्त करण्यात आला. त्याचे वजन १९ किलो १७२ ग्राम आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची किंमत १९ कोटी १७ लाख २० हजार रुपये इतकी आहे. व्हेल माशाच्या उलटीचा साठा, तस्करीसाठी वापरण्यात आलेली ६ लाख ८० हजार रुपये किमतीची दोन्ही वाहनेही ताब्यात घेण्यात आली. एवढ्या मोठ्या प्रमाणात व्हेल माशाची उलटीची तस्करीची घटना शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रथमच सापडल्याचे मानले जाते. मंगेश माधव शिरवडेकर (वय ३६, रा. विश्वकर्मा हाऊसिंग सोसायटी, जवाहर नगर, कोल्हापूर) संतोष उर्फ विश्वास श्रीकृष्ण सागवेकर (वय ३५, वायरी मालवण, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग) वैभव भालचंद्र खोबरेकर (वय २९, मुळगाव कवटी कुडाळ, सध्या रा. देवबाग मयेकरवाडी, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग) यांना सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास अटक करण्यात आली. एकूण १९ कोटी २४ लाख रुपयांचा मुद्देमाल या कारवाईत हस्तगत करण्यात आला. विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पो. निरी. अरुण सुगावकर, सहा. पो. निरी. विक्रम पाटील, उपनिरीक्षक गौतम सोनकांबळे आणि त्यांच्या पथकाने तसेच वाहतूक शाखेकडील फारूक नालबंद, राहुल सातपुते उदय लवटे यांच्या पथकाने ही कारवाई केली.