DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- योगेश गवळे
नाशिक: – पाईपलाईन रोड वरील युवकाच्या खुनाचा उत्रगडा करण्यात सातपूर पोलिसांना यश आत्रे आहे. सातपूरमध्ये नेपाळी युवकाच्या खूनामागे प्रेमप्रकरण असल्याचे समोर आले असून हॉटेलमध्ये एकत्र काम करणाऱ्या मित्रानेच हा खून केल्याचे सूत्रांनी सांगितले.
सातपूरच्या पाईपलाईन रोडवर कौशल्य व्हिला येथे राहणारा युवक महेंद्र प्रकाश सार्की (वय २२) याचा गळा चिरून खून केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली होती. याप्रकरणी सातपूर पोलिसांत अज्ञात संशयितांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त मोनिका राऊत, प्रशांत बच्छाव यांनी तपासकामी सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहम माछ्ळे यांना मार्गदर्शन केले.
तपासादरम्यान पोलिसांच्या निदर्शनास आले की, मयत महेंद्र सार्की हा नेपाळमधील एका तरुणीच्या संपर्कात होता. त्याचा मित्र ईश्वर याच्यासमोर तो तासनतास तिच्याशी फोनवर गप्पा मारायचा. हे ईशश्वरला खटकायचे. ईश्वरने तिला मेसेज करुन तिच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्नही केला होता. मात्र महेंद्र आपल्यासमोर मुद्दाम बोलत असल्याने त्याच्या मनात महेंद्रविषयी राग होता. ईश्वरने त्याचा साथीदार प्रकाश सेठी याच्या मदतीने त्याचा काटा काढायचे ठरवले. अखेर त्याने धारदार शस्त्राने त्याच्यावर वार करुन त्याला ठार मारले. सातपूर पोलिसांनी ईश्वर व प्रकाश या दोन्ही आरोपींना अटक केली असून, त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
दरम्यान सातपुरच्या कामगार नगरामधील गुलमोहर कॉलनी भागातील एका अपार्टमेंटमध्ये राहणार्या हॉटेलमधील तरूण ‘कूक’चा अज्ञातांनी रविवारी (दि.३१) मध्यरात्रीच्या सुमारास गळा चिरून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि.१) सकाळी उघडकीस आली होती. महेंद्र प्रकाश सार्की (२२,रा. कौशल्या व्हिला, गुलमोहर कॉलनी) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव होते.
सातपुर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कामगार नगरमधील गुलमोहर कॉलनीमध्ये कौशल्या व्हिला नावाची अपार्टमेंट आहे. या अपार्टमेंटच्या पहिल्या मजल्यावरील एका खोलीत हॉटेलमध्ये काम करणारे दहा ते बारा लोक एकत्रितपणे राहत होते. त्यांच्यामध्ये महेंद्र हा देखील राहत होता. रात्रीच्या सुमारास तो मोबाइलवरून कोणाशी तरी बोलत होता. यानंतर तो गच्चीवर गेला आणि तेथेच त्याच्यासोबत घातपात झाला असावा, असा संशय पोलिसांनी प्रथमदर्शनी व्यक्त केला होते. गुलमोहर कॉलनी मधील रस्त्यावर सकाळी मृतदेह एका चादरीत गुंडाळलेल्या अवस्थेत पडलेला आढळून आल्यानंतर जागरूक नागरिकांनी पोलिसांच्या डायल ११२ हेल्पलाइनवर संपर्क साधून माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच सातपुर पोलिसांसह उपायुक्त प्रशांत बच्छाव, मोनिका राऊत, सहायक पोलिस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे, शेखर देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तसेच गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकही घटनास्थळी पोहचले होते. यावेळी मृतदेहाच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केलेले आढळून होते. मृतदेहाची ओळख पटवून पंचनामा करत पोलिसांनी शवविच्छेदनासाठी शासकिय जिल्हा रूग्णालयात हलविला होता. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता व फरार मारेकर्यांचा पोलिस शोध घेत होते.