DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी :- अमर मोकाशी
भिवापूर :- वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांकडून घेतली जाणारी एन्ट्री अधिकाऱ्यांनी मध्यंतरी बंद केली होती. ती आता नव्याने सुरु करण्यात आली असल्याची माहिती आहे. त्यामुळे पुन्हा एकदा वाळू भरलेले ट्रक येथील रस्त्यावर सुसाट धावतांना दिसू लागले आहेत.
दरम्यान जे वाहन मालक एन्ट्री देण्यास टाळाटाळ करतात अशांच्या वाहनांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारल्या जात असल्याची माहिती आहे. या कारवाईने एन्ट्री घेणाऱ्या अधिकाऱ्याचा दुहेरी हेतू साध्य होत आहे. वाहनांवर कारवाई दाखवून एकीकडे वरिष्ठाच्या डोळ्यात धुळझोक केली जात आहे तर दुसरीकडे एन्ट्री देण्यास टाळाटाळ करणाऱ्यांना अद्दलही घडवली जात आहे.
नागपूर जिल्ह्याचे विद्यमान पोलीस अधीक्षक श्री पोद्दार यांनी रुजू होताच अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध कडक धोरण अवलंबले. त्यामुळे वाळूच्या वाहनांची एन्ट्री बंद झाली होते. त्यातुन वाळूच्या चोरट्या वाहतूकिला ब्रेक लागून अधिकाऱ्यांच्या वर कमाईवर बंधने आली होती. महसूल अधिकाऱ्यांची सुद्धा हीच स्थिती होती. काही कर्मचारी मात्र रस्त्यावर उभे राहून नगद पैसे घेत वाळूच्या वाहनांना रस्ते खुले करुन देत होते. त्यामुळे कमी प्रमाणात का होईना वाळु वाहतूक सुरु होती. मात्र यातुन अधिकाऱ्यांच्या हाती काही लागत नव्हते. वरकमाईला मुकावे लागत असल्याने अस्वस्थ झालेल्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठाच्या निर्देशांकडे कानाडोळा करीत एन्ट्री सुरु केल्याचे समजते. मागील महिन्यात येथे एन्ट्री सुरु करण्यात आली होती. पैसे सुद्धा जमा केले गेले. मात्र त्याचा जास्तच गाजावाजा झाल्याने हप्ताभरातच ती बंद करावी लागली. आता पुन्हा नव्याने एन्ट्री सुरु करण्यात आली असून ट्रक मालकांकडून वाहन नंबर व पैसे जमा केले जात असल्याची माहिती आहे. आतापर्यंत पन्नास ते साठ वाहनांची यादी तयार झाली असल्याचे समजते.
—->> एका खात्याचे महिन्याचे कलेक्शन दहा ते वीस लाख
वैनगंगेच्या पात्रातील चोरीची वाळू पवनी (जी. भंडारा) वरून भिवापूरमार्गे पुढे उमरेड, नागपूर, बुटेबोरी, वर्धा, अमरावती आदी ठिकाणी नेली जाते. वाळू वाहून नेणाऱ्या वाहनांना रस्ते मोकळे करुन देण्याच्या बदल्यात महसूल,पोलीस, व आरटीओ अधिकाऱ्यांकडून दलालांच्या माध्यमातून महिन्याचे पैसे वसुल केले जातात. त्याला ” एन्ट्री ” असे नाव देण्यात आले आहे. एन्ट्रीचे दर कुठे प्रती ट्रक पंधरा हजार तर कुठे दहा हजार रुपये एवढे आहे. भिवापूर मार्गावर एका खात्याचे एन्ट्रीचे महिन्याचे कलेक्शन दहा ते वीस लाखाच्या घरात असल्याचे समजते.