DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- रविंद्र गवळे
नंदुरबार : पत्रकारांसह वृत्तपत्रांच्या विविध मागण्या शासनाने मान्य करावेत, अशी मागणी नंदुरबार जिल्हा व्हॉइस ऑफ मिडिया व साप्ताहिक विंगतर्फे जिल्हा प्रशासनास दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
याबाबत नंदुरबार येथे निवासी उपजिल्हाधिकारी हरीश भामरे, जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयातील दिनेश चौरे यांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, व्हॉईस ऑफ मीडियातर्फे राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पत्रकार व वृत्तपत्रांच्या विविध मागण्यांसाठी एकदिवशी आंदोलने करण्यात येत आहे. त्याच्यात एक भाग म्हणून नंदुरबार जिल्हा व्हॉईस ऑफ मीडिया व साप्ताहिक विंगतर्फे नंदुरबार जिल्हाधिकारी व जिल्हा माहिती अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये दैनिकाप्रमाणेच साप्ताहिकांनाही जाहिरातीचे वितरण व्हावे. साप्ताहिक वृत्तपत्राची द्वीवार्षिक पडताळणी पाच वर्षात करा, साप्ताहिक वृत्तपत्राच्या जाहिरातीची दरवाढ करावी, अधिस्वीकृती धारक पत्रकारांना एसटी महामंडळात परिवारासह सवलत देण्यात यावी. रेल्वे प्रवासासाठी अधिस्वीकृती धारकांना पुन्हा सवलत सुरू करावी. पत्रकारांसाठी आरोग्य विमा व मोफत मध्ये उपचाराची सवलत देण्यात यावी. आरएनआयकडून नवीन नियमावलीनुसार लादण्यात आलेल्या जाचक अटी रद्द कराव्यात. तसेच ज्येष्ठ पत्रकारांना पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी नंदुरबार जिल्हा व्हाईस ऑफ मीडिया व व्हॉईस ऑफ मीडिया साप्ताहिकतर्फे करण्यात आली. याप्रसंगी व्हॉईस ऑफ मीडियाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष रमाकांत पाटील, व्हाईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंगचे प्रदेश कार्याध्यक्ष राजू पाटील, साप्ताहिक विंगचे जिल्हाध्यक्ष सुभाष कुंभार, व्हॉईस ऑफ मीडियाचे जिल्हा सरचिटणीस राकेश कलाल, सदस्य अकील पिंजारी, धर्मेंद्र पाटील, पेमेंद्र पाटील, प्रतीक पाठक, हिरालाल मराठे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जगदीश ठाकुर आदी उपस्थित होते.