DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- प्रा. नागेंद्र जाधव
चंदगड:- खालसा म्हाळुंगे (ता. चंदगड) च्या हद्दीजवळ तिलारी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये सैन्य दलाच्या जवानांचे प्रशिक्षण सुरू असताना बोट उलटून दोन जवानांचा मृत्यू झाला. विजयकुमार मदनकुमार धिनवाल (वय २८, राजस्थान) व दिवाकर राजू रॉय (२६, पश्चिम बंगाल) अशी त्यांची नावे आहेत. आज दुपारी ही दुर्घटना घडली. ते दोघेही राजपुताना रायफल्सचे जवान होते.
तिलारी जंगल परिसर, तसेच जलाशयामध्ये सैन्य दलातील जवानांना प्रशिक्षण दिले जाते. आज तिलारी जलाशयाच्या बॅकवॉटरमध्ये राजपुताना रायफल्स रेजिमेंटच्या तुकडीचे प्रशिक्षण सुरू होते. मृत विजयकुमार व दिवाकर रॉय लाकडी बोटीतून विहार करत असताना अचानक बोट उलटली. ते बोटीतच अडकले. त्यांना त्यातून बाहेर पडता आले नाही. अंगावरील शस्त्रास्त्रांच्या बॅग्जमुळे त्यांची आणखीअडचण झाली. वेळेत पाण्यातून बाहेर येऊ न शकल्याने नाका तोंडात पाणी जाऊन दोघे बुडाले. तुकडीतील वरिष्ठ अधिकारी व सहकाऱ्यांनी त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले. काही जवानांनी त्यांना पाण्यातून बाहेर काढले; मात्र बेळगाव येथे रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या संदर्भात चंदगड येथील पोलिस ठाण्यात अकस्मात मयत 52/2024 BNSS 194 नुसार नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास पो. हे. कॉ. 895 कांबळे करीत आहेत.