DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- योगेश गवळे
नाशिक:- पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी मानवी जीवितास धोका असणाऱ्या नायलॉन मांजा विक्री करणाऱ्याबाबत दि.3 डिसेंबर 2024 महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 अन्वये मनाई आदेश पारित करून त्यावर कठोर कारवाई करण्याबाबत आदेशित केलेले होते.
पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 श्रीमती मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ.सचिन बारी यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी व सह पोलीस निरीक्षक सूर्यवंशी व पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकास सदर कारवाई करण्याबाबत आदेश दिले.
पोलीस अंमलदार समाधान वाजे, अजय देशमुख यांना गोपनीय बातमी मिळाली की, एक इसम सिन्नर फाटा मार्केट यार्ड येथे नायलॉन मांजा विक्री करण्याकरिता येणार आहे. सदर बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांना सांगितले असता बातमीची खात्री करण्याकरिता लागलीच गुन्हे शोध पथक रवाना केले. सिन्नर फाटा, एकलहरा रोड, मार्केट यार्डचे बाजूला पत्र्याचे शेडलगत एक इसम संशयास्पद मिळून आल्याने त्याच्याकडील प्लास्टिक सफेद रंगाची गोणीची झडती घेतली असता त्यामध्ये वेगवेगळ्या रंगाचे एकूण 97 नायलॉन मांजाचे गट्टू मिळून आले, त्यास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव देवेंद्र गोविंद शिरसाट असे सांगितले.
सदर आरोपीस तपासकामी ताब्यात घेऊन त्याच्यावर नाशिक रोड पोलीस ठाणे येथे गु.र.नंबर 657 ऑब्लिक 2024 भारतीय न्याय संहिता कलम 223 सह पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 कलम 5,15 म.पो.का कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.