IPL Mega Auction 2022 : आयपीएलच्या मेगा लिलावासाठी बीसीसीआयने 590 नावे फायनल केली आहेत. यामध्ये स्फॉट फिक्सिंगच्या आरोपामुळे अनेक वर्षांपासून मैदानाबाहेर असलेला जलदगती गोलंदाज एस श्रीसंतच्या (S Sreesanth) नावाचा समावेश आहे. याआधी मिनी लिलावात श्रीसंतने आयपीएलमध्ये नाव नोंदणी केली होती. सात वर्षाच्या बंदीनंतर क्रिकेट मैदानावर परतलेल्या एस श्रीसंत (s sreesanth ) ला यावेळी मोठा धक्का बसला होता. 2021 च्या मिनी लिलावात अंतिम यादीत त्याला स्थान मिळाले नव्हते. पण आता त्याची वर्णी लागली आहे. श्रीसंतने यावेळी 75 लाख रुपये मूळ किंमतीसह नाव नोंदवले होते.
यावेळी मात्र एस श्रीसंत (s sreesanth ) याने आपली किंमत कमी केली होती. 50 हजार मूळ किंमतीवर त्याने नाव नोंदणी केली होती. आयपीएलच्या मेगा लिलावातील (IPL Mega Auction 2022) यादीत नाव आल्यानंतर श्रीसंतने सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. लव्ह यू ऑल. सर्वांचा आभारी आहे. अंतिम लिलावासाठीही माझ्यासाठी प्रार्थना करा, ओम नम: शिवाय! अशा शब्दांत श्रीसंतने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
आयपीएलच्या 2013 मध्ये झालेल्या हंगामात श्रीसंतवर स्पॉट फिक्सिंगचा आरोप झाला होता. याप्रकरणात त्याच्यावर आजीवन बंदीची कारवाई झाली. या निर्णयाला श्रीसंतने कोर्टात आव्हान दिले. कोर्टाचा निकाल त्याच्या बाजूनं लागला आणि 7 वर्षांच्या शिक्षेनंतर श्रीसंतचा क्रिकेटच्या मैदानात उतरण्याचा मार्ग मोकळा झाला. कमबॅक केल्यानंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याला विशेष छाप सोडता आलेली नाही. पण त्याचा क्रिकेटबद्दलच प्रेम अद्यापही कमी झालेलं नाही. आयपीएलच्या मेगा लिलावात वर्णी लागल्यानंतर कोणता संघ त्याला आपल्या ताफ्यात घेण्यात रस दाखवणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
श्रीसंतसोबत चेतेश्वर पुजाराची मूळ किंमत देखील 50 लाख इतकी आहे. त्याच्याशिवाय इंग्लंडचा जलदगती गोलंदाज जोफ्रा आर्चर 2 कोटी मूळ किंमत असणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आहे. जोफ्रा आर्चरशिवाय डेव्हिड वॉर्नर, रविचंद्रन अश्वन, ट्रेंट बोल्ट, पॅट कमिन्स, क्विंटन डिकॉक, शिखर धवन, फाफ ड्युप्लेसीस, श्रेयस अय्यर, कगिसो रबाडा आणि मोहम्मद शमी ही मंडळींची मूळ किंमत 2 कोटी रुपये इतकी आहे.