मनसे बैठक
मुंबई: राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली. आगामी महापालिका निवडणुकीत मनसे कार्यकर्त्यांना स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाण्याचे आदेश राज ठाकरे यांनी दिल्याचं समोर आलं आहे. महापालिका निवडणुकीसाठी मनसेनं स्वबळाचा नारा दिला आहे. एप्रिलमध्ये निवडणुका ग्रहित धरुन कामाला लागा, असे आदेश राज ठाकरे यांनी दिले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मनसे भाजप युतीच्या चर्चा होत्या. आपण एकटे लढण्याची तयारी करावी, असे आदेश मनसे नेत्यांना राज ठाकरेंनी दिले आहेत. आपली स्वबळाची तयारी असली पाहिजे, असं राज ठाकरे म्हणाल्याचं कळतंय. मनसेच्या आगामी काळात विधानसभा निहाय बैठका आयोजित केल्या जातील. तर, लोकसभा निहाय बैठका राज ठाकरे घेणार आहेत.
संदीप देशपांडे काय म्हणाले?
निवडणुकांचं नियोजन कसं करायचं, सोशल मीडियाचं नियोजन कसं करायचं, उमेदवारांची निवड कशी करायची, या विषयी चर्चा झाली आहे. राज ठाकरे यांनी आम्हाला स्वतंत्रपणे लढण्याचे आदेश दिले आहेत. झोपलेली महाविकास आघाडी हा आमच्या समोरील मुद्दा आहे. शिवसेनेनं प्रभाग रचना बदलली तरी नाराजी बदलू शकत नाही. शिवसेनेला अनुकूल असं काही नसतं. मराठी माणसं, हिंदू माणसं सेनेबरोबर आहेत का? लोकांची मानसिकता शिवसेनेसोबत नाही. कोरोना काळात लोकांना त्रास झालेला आहे. आजचं मरण उद्यावर टाकण्याचा प्रयत्न असल्याचं मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले आहेत. मुंबईचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न कुणीही केला तरी गेल्या दीडशे वर्षातही ते कुणाला जमणार नाही, असं संदीप देशपांडे म्हणाले.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक
राज्यातील महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी आणि रणनिती संदर्भात मनसेची बैठक बोलावण्यात आली. मुंबई , पुणे , पिंपरी चिंचवड , ठाणे आणि नाशिक येथील पक्ष पदाधिकारी मुंबईतील बैठकीला उपस्थित होते.
सध्या तरी भाजपशी युतीचा निर्णय नाही
राज ठाकरे यांनी गेल्या सहा महिन्यांमध्ये पुणे आणि नाशिकचे दौरे केले होते. पुणे आणि नाशिकच्या दौऱ्यावर असताना राज ठाकरे यांनी तेथील स्थितीचा आढावा घेतला होता. मुंबई महापालिका निवडणूक देखील मनसेसाठी महत्त्वाची आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडी विरोधत लढण्यासाठी मोठ्या पक्षासोबत युती असावी, अशी भूमिका पक्षाच्या काही कार्यकर्त्यांची होती. मात्र, मनसे आणि भाजपची युती सध्यातरी होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. एमआयजी क्लबमध्ये सुरु असलेल्या बैठकीला मनसे आमदार राजू पाटील, अमित ठाकरे, अविनाश अभ्यंकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे यांच्यासह मनसेचे महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते.