DPT NEWS NETWORK 🗞️ 📹 🗞️ ✍️ 🚨 दर्शन पोलीस टाईम 🚨 प्रतिनिधी:-
(प्रतिनिधी) – राजेंद्र पवार
सांगली:- मिरज आणि कुपवाड शहर महापालिका हद्दीतील मिरज विभागीय कार्यालयातील कोणत्याच विभागात अधिकारी नियमितपणे उपस्थित राहत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांवर कोणताही शिस्तीचा अंकुश राहिलेला नाही. यामुळे मिरज विभागीय कार्यालयाचा कारभार पूर्णपणे रामभरोसे झाला असून, नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर “मिरज विभागीय कार्यालय बंद करून टाका” अशी संतप्त मागणी मिरज सुधार समितीने नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मिरज शहराचे भौगोलिक क्षेत्र व लोकसंख्या सांगली शहराइतकीच असूनही, मिरज विभागीय कार्यालयाकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. येथे अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, तसेच बांधकाम, नगररचना, घरपट्टी, जन्म-मृत्यू व जलनिस्सारण असे अनेक महत्त्वाचे विभाग असतानाही, संबंधित अधिकारी कार्यालयात नियमितपणे उपस्थित राहत नाहीत.
अतिरिक्त आयुक्त व उपायुक्त हे सांगली मुख्यालयातील अतिरिक्त जबाबदाऱ्या सांभाळत असल्याचे कारण देण्यात येते. तसेच इतर विभागांचे प्रभारी अधिकारी इतरही पदभार सांभाळत असल्यामुळे मिरजमध्ये फारशा वेळा राहत नाहीत. त्यामुळे कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर कुणाचाही वचक राहिलेला नाही. सहाय्यक आयुक्तपद एका कनिष्ठ लिपिकाच्या हातात देण्यात आले असून, त्यांना कोणतेही निर्णय घेण्याचे अधिकारच नाहीत.
जन्म-मृत्यू विभागात दररोज मोठी गर्दी होत असून, अधिकारी अनुपस्थित असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड गोंधळ उडतो. नागरिकांची कामे रखडत असून, तक्रारी करण्यासाठी जबाबदार कोणीच नसल्याचे चित्र आहे.
यासंदर्भात मिरज सुधार समितीचे अॅड. ए. ए. काझी, अध्यक्ष राकेश तामगावे, कार्यवाह असिफ निपाणीकर, नरेश सातपुते, तौफिक देवगिरी, वसीम सय्यद, सलीम खतीब, संतोष जेडगे, अभिजीत दाणेकर आदींनी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन सादर करताना “अधिकारी उपस्थित राहत नसतील, आणि आयुक्त सत्यम गांधी यांना देखील मिरजच्या कामकाजात स्वारस्य नसेल, तर हे कार्यालय बंद करून टाका,” अशी तीव्र भावना व्यक्त केली.



