नंदुरबार – रविंद्र गवळे
बामखेडा येथील ग्राम विकास संस्थेच्या कला महाविद्यालयात कर्मचाऱ्यांचा आयकर संदर्भात उद्बोधन वर्ग प्राध्यापक प्रबोधिनी विभागाच्या विद्यमाने संपन्न झाला. शहादा परिसरातील अभ्यासू आयकर सल्लागार श्री. अल्ताफ हसमानी यांनी अनमोल मार्गदर्शन केले. सर्वप्रथम ग्राम विकास संस्थेचे अध्यक्ष श्री. पुनादादा यांनी हसमानींचा शाल व बुके देऊन सन्मान केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री पुनादादा होते. श्री.अल्ताफ हसमानी यांनी प्रथम आयकर संदर्भातील मार्गदर्शक पोम्प्लेट सर्व उपस्थितांना दिले. त्यानंतर त्यांनी अर्थसंकल्प आणि आयकर याबाबतीत विवेचन करून नवी कररचना व जुनीकर रचना स्पष्ट केली. आयकर वजावटी संदर्भातील कलम ८० डीडीबी,८०सीसीजी, ८०डीडी, आयएएस व टीआयएस स्टेटमेंट आणि त्यांचा आयकर कार्यवाहीशी संबंध. दीर्घकालीन व अल्पकालीन भांडवली नफा आणि त्यावरील कर तसेच आयकर संदर्भातील महत्त्वाचे कलम 139,143, 151, 152 यांचे स्वरूप स्पष्ट केले. आयकर संदर्भातील ‘वन एन्ट्री वन एक्झिट’ या नव्या तत्वाचे विवेचन करून एनपीएस मधील टीअर वन व टीअर टू चे विवेचन केले.उपस्थितांच्या शंकांचे समाधान करण्यात आले. अर्थसंकल्पातील विविध बाबींचा आढावा मांडून रोखीने व्यवहार टाळला पाहिजे असा सल्लाही त्यांनी उपस्थितांना दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.ए.एम.गोसावी यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष यांच्या वतीने प्राचार्य डॉ.एस. पी. पाटील यांनी आयकर हा कर्मचाऱ्यांच्या आर्थिक नियोजनातील महत्त्वाचा विषय व त्यावर हसमानी यांनी अभ्यासपूर्ण विवेचन केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विभाग प्रमुख डॉ. आर्.एस. जगताप यांनी केले व आभार प्रकटन प्रा.डी. बी. वाघ यांनी केले.