प्रतिनिधी- हरिश्चंद्र महाडिक
सुतारवाडी: नवजीवन विद्यामंदिर व कै.द.ग. तटकरे ज्यु.कॉलेज इंदापूर तसेच जिल्हा मराठी भाषा संवर्धन समिती रायगड व कोकण मराठी साहित्य परिषद तळा शाखा यांच्यामार्फत मराठी भाषा गौरव दिनानिमित कवी, कुसुमाग्रज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी व्याख्यानासाठी प्रमुख अतिथी म्हणून कवी, गीतकार, लेखक, तथा रिलायंन्स कंपनी नागोठणेचे जनसंपर्क अधिकारी रमेश धनावडे तसेच चंद्रशेखर देशमुख हे विद्यालयाचे अध्यक्ष या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर कोमसाप तळा शाखा अध्यक्ष हेमंत बारटक्के, कोमसाप जिल्हा प्रतिनिधी जितेंद्र म्हात्रे, सौ.पूनम धनावडे, प्रभारी मुख्याध्यापक गावडे हे मान्यवर उपस्थित होते. सर्व शिक्षक, शिक्षिका व इतर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम रंगला.अत्यंत प्रसन्न वातावरणात सुरू झालेला हा कार्यक्रम नंतर एका वेगळ्याच उंचीवर गेला !
यावेळी रमेश प्रभाकर धनावडे यांची कोकण मराठी साहित्य परिषद रायगड शाखेचा जिल्हा प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली असल्याने त्याबद्दल कोमसाप तळा शाखा अध्यक्ष हेमंत बारटक्के, कोमसाप जिल्हा प्रतिनिधी जितेंद्र म्हात्रे यांनी सत्कार केला.
सुरुवातीला दिपप्रज्वलन व सरस्वतीपूजन करण्यात आले. विद्यालयाचे संगीत शिक्षक अजित भोपी व विद्यार्थ्यांनी सुस्वर ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले. प्रास्ताविकात मराठी भाषा संवर्धन समिती सदस्य चंद्रशेखर देशमुख यांनी मराठी भाषेचे महत्त्व सांगून पाहुण्यांचे स्वागत केले. कविसंमेलनात भरत जोशी, उल्का माडेकर, प्रणय इंगळे यांनी काव्य तर नागेश नायडू यांनी बहारदार गझल सादर करुन रसिकांची मने जिंकली. आपल्या व्याख्यानात रमेश धनावडे यांनी मराठी भाषेचा इतिहास सांगितला. कवी कुसुमाग्रज यांच्या काव्य व साहित्याचा परामर्श घेऊन स्वतःच्या विनोदी कविता, मार्मिक चारोळ्या सादर करुन रसिकांना हसवता हसवता अंतर्मुख केले. को.म.सा.प.तळा शाखा अध्यक्ष हेमंत बारटक्के यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, ‘मराठी भाषा ही साधी सरळ असून आपल्या थोर साहित्यिकांनी साध्या शब्दातच अनेक गोष्टीचे वर्णन आपल्या साहित्यातून प्रभावीपणे केले आहे. यावेळी उपस्थित सर्व शिक्षकांना पुस्तक भेट देण्यात आले. कार्यक्रमात विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी यांनी महामहिम राष्ट्रपतींना लिहिलेली पत्रे पोस्ट कर्मचारी मधुकर राशिनकर यांचेकडे सुपूर्द करण्यात आली. कार्यक्रमाचे सुञसंचालन प्रा.शब्बीर हज्जू यांनी केले.