प्रतिनिधी
प्रा. भरत चव्हाण
तळोदा
नंदुरबार, दि.4 : कृषि विभागामार्फत जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना, डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतील विविध सिंचन घटकाचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सिंचन योजना संदर्भात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी निलेश भागेश्वर, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी प्रदीप लाटे, जिल्हा अग्रणी बँकेचे मुख्य व्यवस्थापक जयंत देशपाडे, जिल्हा उद्योग केंन्द्राचे व्यवस्थापक दिलीप पाटील, आर्थिक समावेशनचे जिल्हा व्यवस्थापक उमेश अहिरराव, तंत्र अधिकारी वसंत चौधरी आदी उपस्थित होते.
यावेळी श्रीमती खत्री म्हणाल्या की, शेतकऱ्यांने पारपारिक पद्धतीने शेतीला पाणी दिल्यास इंधन, वेळ आणि पाण्याचा अपव्यय होतो. त्यामुळे शेतीमध्ये आधुनिक पद्धतीचा वापर व्हावा म्हणून केंद्र व राज्य शासनामार्फत विविध सिंचन योजना राबविण्यात येत आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतंर्गत शेतकऱ्यांना शासनाकडून सुक्ष्म सिंचनासाठी फळबाग तसेच कृषी पिकासाठी ठिबक सिंचन आणि तुषार सिंचनासाठी अनुदान देण्यात येते. तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतंर्गत अनुसूचित जाती, नवबौध्द शेतकऱ्यांना नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती, बोअरवेल, पंप संच, प्लॉस्टिक अस्तरीकरणासाठी अनुदान देण्यात येते. तसेच बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेतंर्गत अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना नवीन विहीर खोदणे, जुनी विहीर दुरुस्ती, इनवेल बोअरिंग, वीज जोडणी आकार, पंप संच, पिव्हीसी/ एसडीपीई पाईप, शेत तळ्यांचे प्लास्टीक अस्तरीकरण, परसबाग, सूक्ष्म सिंचन संच या बाबींसाठी अनुदान देण्यात येते. या विविध सिंचन घटकांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी https://mahadbtmahait.gov.in महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करुन जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.