रिपाई मराठा आघाडीचा पत्रपरिषदेत इशारा
धुळे प्रतिनिधी : प्रकल्पग्रस्ताचे बनावट प्रमाणपत्र व त्यावर नोकरी मिळविणारा अभियंता उमेश पाटील याला अटक करण्यासह प्रमाणपत्राशी संबंधीत अधिकार्यांवर गुन्हा दाखल करावा. अन्यथा १५ मार्चपासून आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा रिपब्लीक पार्टी ऑफ इंडीयाचे राष्ट्रीय महामंत्री पंकज साळुंखे यांनी दिला आहे. तसेच खर्या लाभार्थ्यांना न्याय देवून त्यांच्या मुलांना शासकीय नोकरी द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रपरिषदेला लोक जनशक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष दिलीप साळवे, प्रकल्पग्रस्त शेतकरी ज्ञानेश्वर पाटील आदी उपस्थित होते. यावेळी पंकज साळुंखे यांनी सांगितले की, प्रशासनाने काही दिवसांपुर्वी प्रकल्पग्रस्ताचे बनावट प्रमाणपत्र घेणार्या ठाणे येथील शाखा अभियंता उमेश प्रभाकर पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केला. मात्र अद्यापही त्यांच्या नियुक्ती दिनांकापासून ते आजअखेर त्यांनी घेतलेले वेतन, वेतनेत्तर लाभ वसूल केले नाही. तसेच त्यांना अटक केली नाही. त्यामुळे गुन्हा दाखल करून प्रशासनाने केवळ दिखावा केला. स्थानिक प्रशासन याप्रकरणाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही श्री.साळुंखे यांनी केला. वास्तविक उमेश पाटील हा पाचोरा येथे बसून आहे. पोलिसांनी त्याला अटक करावी, असे आवाहन त्यांनी केले. तसेच नितीन इंगळे, प्रविण पवार, नितीन पवार व संजयकुमार पाटील या चारही बनावट प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रधारकांची आतपर्यंत चौकशी होवून त्यांच्यावर कोणतही कारवाई झालेली नाही. त्यामुळे चारही प्रकल्पग्रस्त दाखला धारकांवर कारवाई करावी, अशी मागणीही यावेळी केली. या मागणीसाठी दि. २ पासून रिपाई व लोकजनशक्ती पार्टीतर्फे बेमुदत उपोषण करण्यात येत आहे. मात्र त्यांची कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे उमेश पाटील याला अटक करून त्याला साथ देणार्यांवर व वरील चौघा बनावट प्रमाणपत्रधारकांवर देखील गुन्हे दाखल करावे, अशी मागणीही पंकज साळुंखे यांनी केली आहे.
आमदारासह नगरसेवकाचा सहभाग- बनावट प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र प्रकरणात एका आमदारासह नगरसेवकांचा देखील सहभाग आहे. लवकरच पुराव्यानिशी त्यांची नावे जाहिर करेल, असे श्री. साळुंखे यांनी यावेळी सांगितले. तसेच या प्रकरणी मुंबई उच्च न्यायलयाच्या औरंगाबाद खंडपिठात देखील याचिका दाखल केली असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान बनावट प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र धारकांना काही चुकीचे आढळले तर आपल्यावर मानहानीचा गुन्हा नोंदवावा, असे आव्हानही श्री. साळुंखे यांनी पत्रपरिषदेत त्यांना दिले.
५० लाखांची ऑफर नाकारली- आपली उमेश प्रभाकर पाटील याने फसवणूक केल्याचीबाब नुकतीच लक्षात आली. त्यानंतर तो ५० लाख रूपयांची बॅग घेवून आपल्याकडे आला होता. मात्र त्यास आपण नकार दिला. मला पैसे नको न्याय हवा, असे सांगत माझ्या मुलाला शासनात नोकरी देवून आपली फसवणूक करणार्या संबधीत अधिकारी व कर्मचार्यांवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी यावेळी प्रकल्पग्रस्त शेतकरी ज्ञानेश्वर पंडीत पाटील यांनी केली.