धुळे – प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेची पंचवार्षिक निवडणूक 2017 ला होणे गरजेचे होते. परंतु सत्ताधा-यांची उदासिनता व करोनामुळे निवडणूक पाच वर्षे लांबणीवर पडली. सहा जागांसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत 2 लाख 80 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. फार्मसी कौंसिलच्या या निवडणुकीत परिवर्तन पॅनल सत्ताधा-यांना धोबीपछाड मारणार असून आपले वर्चस्व निर्माण करणार असल्याचे रिटेल केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष सचिन भालेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
या पत्रकार परिषदेप्रसंगी आरसीडीचे राज्य उपाध्यक्ष धनंजय खाडगीर, जिल्हाध्यक्ष विलास कोठावदे, उपाध्यक्ष नीलकंठ सालके, सचिव अजय कांकरिया, गणेश हरगुडे, वैशाली कोठावदे, प्रणाली धामणे, खुशबू बंब, स्मिता पाटकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. सत्ताधा-यांकडून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार, गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले.12 जणांवर एफ आय आर दाखल करण्यात आली आहे. जुन्या संघटनांनी सेटलमेंट केली. राज्यात 550 फार्मासिस्ट लायसन्स भाड्याने देण्यात आली असल्याचा गौप्यस्फोट भालेकर यांनी केला. दि.17 जुन 2022 पर्यंत मतदान प्रक्रिया सुरू राहणार असून दि, 25 जुन 2022 रोजी मतमोजणी होणार आहे.



