प्रतिनिधी
प्रविण चव्हाण नंदुरबार : पत्नीने न्यायालयात दाखल केलेली केस मागे घ्यावी म्हणून मध्यस्थी न केल्याने एका वर चाकू हल्ला करून जखमी केल्याची घटना नवापूर तालुक्यातील भवरे ( ता . नवापूर ) येथे घडली . याबाबत एकाविरुद्ध ठार मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी नवापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . रवींद्रकुमार उर्फ रवींद्र शंकर गावित ( रा . भवरे , ता . नवापूर ) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे . तर रवीत गावित असे जखमीचे नाव आहे . पोलीस सूत्रांनुसार , रवींद्र गावित व त्यांची पत्नी रिंकू गावित कौटुंबिक यांच्यात वादातून न्यायालयात केस सुरू आहे . ती केस पत्नीने मागे घ्यावी यासाठी रवीत जालम्या गावित याने मध्यस्थी करावी , अशी अपेक्षा रवींद्र याने व्यक्त केली . परंतु रवीत याने त्याचे ऐकले नाही . त्यामुळे संतापलेल्या रवींद्र गावित याने हे कृत्य केले .
भवरे ते सुकाफळी रस्त्यावरून रवीत गावित हा आपल्या दुचाकीने ( क्रमांक जीजे २६ एफ २५५५ ) जात असतांना मागून येऊन त्याच्यावर चाकू हल्ला केला . त्यात त्याच्या छातीला तसेच दंडावर गंभीर जखमा झाल्या . त्यानंतर तो तेथून पसार झाला . . या बाबत रवीत गावित याने फिर्याद दिल्याने रवींद्र शंकर गावित याच्याविरुद्ध नवापूर पोलिसात ठार मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे करीत आहेत .