बेंगळुरू : एका व्यावसायिक बापाने आपल्या मुलासोबत झालेल्या भांडणानंतर त्याला पेटवून दिल्याची धक्कादायक घटना कर्नाटकची राजधानी बेंगळुरू येथे घडलीय. या संपूर्ण घटनेमागे मुलगा वडिलांना आर्थिक माहिती देऊ शकत नसल्याचे कारण सांगितले जात आहे. रिपोर्ट्सनुसार, जेव्हा मुलगा व्यवसायाशी संबंधित हिशेब देऊ शकला नाही, तेव्हा आधी वादावादी झाली, नंतर वडिलांनी केमिकल टाकून मुलाला पेटवून दिले. सुरेंद्र असे आरोपी पित्याचे नाव असून अर्पित असं मृत्युमुखी पडलेल्या मुलाचं नाव आहे. बापाने मुलाला पेटवल्याची घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
हे संपूर्ण प्रकरण पश्चिम बंगळुरूमधील वाल्मिकी नगरमधील आहे. हा परिसर चामराजपेठ पोलीस ठाण्यांतर्गत येतो. वाल्मिकी नगर येथे राहणारा सुरेंद्र फॅब्रिकेशनचा व्यवसाय करतो. त्याचवेळी त्यांचे एक दुकानही होते, ते सुरेंद्र आणि त्यांचा मुलगा अर्पित मिळून चालवत होते. घटनेच्या दिवशी म्हणजेच 1 एप्रिल रोजी सुरेंद्रने मुलाकडे दुकान आणि व्यवसाय खात्याशी संबंधित हिशोब मागितले, ज्यामध्ये अर्पित सुमारे 1.5 कोटींचा हिशेब देऊ शकला नाही.
यावरून पिता-पुत्र दोघांमध्ये वादावादी झाली. शाब्दिक चकमक एवढी झाली की हाणामारीपर्यंत मजल गेली. यानंतर व्यापारी वडील सुरेंद्र यांनी मुलगा अर्पितवर केमिकल ओतले. या भांडणात दोघेही घराबाहेर पडले. त्यानंतर सुरेंद्रने अर्पितला माचिसने पेटवून दिले. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या अर्पितला शहरातील व्हिक्टोरिया रुग्णालयात नेण्यात आले. हॉस्पिटलमध्ये उपचारांदरम्यान अर्पितचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी बापाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे