प्रतिनिधी
प्रविण चव्हाण
नंदुरबार :- नंदुरबार तालुक्यातील होळतर्फे रनाळे येथे जमीनीच्या वादाला कंटाळुन आश्रमशाळेतील शिपायाने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना घडली असुन या प्रकरणी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात ६ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
या बाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नंदुरबार तालुक्यातील वेडापावला आश्रम शाळेतील शिपाई तसेच होळतर्फे रनाळे येथील रहिवाशी श्रीराम साहेबराव पाटील ( ५० ) यांच्याकडे असलेल्या जमीनीतुन त्यांचा चुलतभाऊ नरेंद्र पाटील हा ६० आर जमीनीची मागणी करीत होता . तसेच अधिकार खैरनार हा सुध्दा ६० आर जमीनीची मागणी करीत होता त्यानंतर शत्रुघ्न पाटील , भरत पाटील व प्रकाश पाटील हे तिघे सख्खे भाऊ सुध्दा जमीनीची मागणी करीत होता . जमीनीच्या मागणीला कंटाळुन चिंताग्रस्त झालेल्या श्रीराम साहेबराव पाटील यांनी त्यांच्या जुन्या घराच्या पहिल्या खोलीत गळफास घेवुन आत्महत्या केली . याबाबत मयत श्रीराम पाटील यांचे शालक अनिल विश्वास पाटील रा . तिसी ता . नंदुरबार यांच्या फिर्यादी वरुन नरेंद्र मुरलीधर पाटील , ब्रिजलाल काशिनाथ पाटील , शत्रुघ्न नारायण पाटील भरत नारायण पाटील , प्रकाश नारायण पाटील , सर्व रा . होळतर्फे रनाळा ता . जि . नंदुरबार , अधिकार धुडकु खैरनार रा . पिंपरखेडा ता . शिंदखेडा यांच्या विरुध्द नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात भादवी कलम ३०६ , ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .