प्रतिनिधी – रमजान मुलानी
सांगली: आषाढी वारीसाठी निघालेल्या वारकाऱ्यांच्या दिंडीला अपघात झाला आहे. या आपघातात १६ वारकरी गंभीर जखमी झाले आहेत. मिरज-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गवरील केरेवाडी फाट्याजवळ हा अपघात झाला आहे. वारकऱ्यांच्या दिंडीत पिकअप जीप घुसल्याने हा अपघात घडला आहे. यामध्ये जखमी झालेल्या वारकऱ्यांना मिरज शासकीय आणि कवठेमहांकाळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी येथील वारकरऱ्यांची पायी दिंडी ही पंढरपूरला निघाली आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरील केरेवाडी येथे ही वारी पोहोचली असता, मागून आलेल्या भरधाव पीकअप जीप गाडीने आधी दिंडीत असणाऱ्या छोटा हत्ती या टेम्पोला जोरदार धडक दिली. त्यानंतर गाडी पायी निघाललेल्या दिंडीमध्ये घुसून पलटी झाली.
या अपघातात १६ वारकरी जखमी झाले, या सर्वांना तातडीने मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पिकअप जीपच्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. त्यानंतर ड्रायव्हर पळून गेला आहे. या घटनेची नोंद कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास पोलीस करत आहेत. मात्र, या अपघातात सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी नाही झाली.