DPT News Network सांगली : सांगलीतील मिरजमध्ये मच्छी मार्केट आणि मटन मार्केटचा नवीन इमारतीचा भूमिपूजन समारंभ मिरजचे आमदार सुरेश खाडे आणि सर्वपक्षीय नगरसेवक यांच्या उपस्थितीत करण्यात आला. मिरजेतील मच्छी आणि मटन मार्केट या ठिकाणी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निधीतून 67 लाखाच्या निधीतून नव्याने मच्छी मार्केट आणि मटन मार्केट उभारणार आहे.
पण भूमिपूजनाचा समारंभ संपल्यानंतर ठेकेदाराने इमारत पाडण्यास सुरुवात केली. यावेळी मटन मार्केटमधल्या एका गटाने बांधकाम पाडत असलेल्या मजुरांना काम रोखण्यास सांगितलं आणि मजुरांना मारहाण करण्यास सुरुवात केली.
बघता बघता हा वाद मच्छी मार्केट आणि मटन मार्केट या दोन गटात वाढत गेला. काठी, दगड, वीट ज्या वस्तू हाती लागतील त्या वस्तू घेऊन दोन्ही गटातील लोकं एकमेकांवर तुटून पडले. दोन गटात तुफान हाणामारी होत असताना याबाबत मिरज शहर पोलिसांना माहिती मिळाली.
मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे हे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मध्यस्थी करत हा वाद थांबवला. याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं असून मच्छी मटन मार्केट परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.