स्थानिक गुन्हे शाखा व नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाने : तीन दिवसात गुन्हा आणला उघडकीस….
प्रविण चव्हाण, जिल्हा क्राईम रिपोर्टर. नंदुरबार.
नंदुरबार – नंदुरबार येथे चिमुकलीवर अत्याचार करुन जिवे ठार मारणाऱ्या महिलेसह तीन नराधमांना नंदुरबार पोलीसांनी अटक केली आहे .
या बाबत अधिक माहिती अशी की , दि . ५ जुलै २०२२ रोजी सकाळी ७ वा च्या सुमारास नंदुरबार शहरातील रेल्वे कॉलनी परिसरातील रेल्वे नियंत्रण कक्षाच्या लगत असलेल्या एका शौचालयाच्या टाकीत पाण्यावर पालथं स्थितीत लहान बालिकेचा वय अंदाजे २ वर्षे हिचा मृतदेह दिसून आला , म्हणून परिसरातील नागरिकांनी सदरची घटना नंदुरबार शहर पोलीसांना कळविल्यानंतर नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व पोलीस अमलदार यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली .
घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांनी सदर घटने बाबत नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील , अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांना कळवून चिमुकलीचे प्रेत शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे पाठविले . शवविच्छेदनाचा अहवाल आज दि . ०७ जुलै २०२२ रोजी प्राप्त झाल्या नंतर नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे पोलीस उप निरीक्षक हेमंत मोहिते यांचे फिर्यादी वरून अज्ञात आरोपीताविरुद्ध लैंगिक अत्याचार व खून करून पुरावा नष्ट केल्याबाबतचा गुन्हा आज रोजी नोंदविण्यात आला आहे .
बालिकेचा मृतदेह मिळाल्यापासून बालिकेnसोबत काही तरी वाईट कृत्य करून तिचा घातपात केल्याचा संशय नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर पाटील यांना आला . घटनेचे गांभीर्य लक्षात . घेऊन नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील , अपर पोलीस अधीक्षक विजय पवार व उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर व नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांच्या नेतृत्वाखाली मयत बालिकेची ओळख पटविण्यसाठी व गुन्ह्यात सहभागी असलेल्या अज्ञात आरोपीचा तात्काळ शोध घेण्यासाठी वेगवेगळी पथके तयार करुन त्यांना कारवाई करण्याचे आदेश दिले . घटनास्थळावर आरोपी शोधण्यास मदत होवु शकेल असे कोणत्याही प्रकारचे पुरावे , प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तसेच इतर कोणतीही वस्तू मिळून आलेली नव्हती . त्यामुळे गुन्हा उघडकीस आणण्याचे मोठे आव्हान पोलीसांसमोर होते . वरिष्ठांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा व नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या अमलदारांचे मिळून वेगवेगळे ७ पथके तयार करुन तपासासाठी रवाना करण्यात आले . चिमुकली कोण ? चिमुकलीचे आई- वडील कोण ? चिमुकलीचे मारेकरी कोण ? चिमुकलीला का मारण्यात आले ?मारण्याचा उद्देश काय ? असे मोठे प्रश्न अजुनही पोलीसांपुढे उभे होते . बालिकेचा मृतदेह मिळून दिवस लोटला होता , परंतु आरोपी किंवा इतर कोणतीही उपयुक्त माहिती मिळुन येत नव्हती त्यामुळे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी आर . पाटील , अपर पोलीस अधीक्षक विजय पवार उप विभागीय पोलीस अधीकारी , नंदुरबार सचिन हिरे , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर हे नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथेच तळ ठोकून होते . नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी .आर. पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की नंदुरबार शहरातील कंजरवाडा परिसरात फिरणाऱ्या एका महिलेकडे दि . ३ जुलै २०२२ रोजी सायंकाळी अंदाजे २ वर्ष वयाची लहान मुलगी होती व तिच्यासोबत आणखी तीन ते चार इसम फिरत होते .
सदरची माहिती नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर व नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना सांगितली व तपासाचा आराखडा तयार केला .
पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर हे स्वतः स्थानिक गुन्हे शाखेच्या पदकासह नंदुरबार शहरातील कंजरवाडा परिसरात संशयोत महिलेला ताब्यात घेण्यासाठी रवाना झाले . स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नंदुरबार शहरातील कंजरवाडा रेल्वे स्टेशन व आजुबाजुच्या परिसरात संशयीत महिलेचा शोध घेतला परंतु तिचा निश्चित ठावठिकाणा नसल्यामुळे संशयीत महिलेचा शोध घेण्यात पोलीस पथकाला अडचणी येत होत्या .
नंदुरबार शहर व आजुबाजुच्या परिसरात संशयास्पद स्थितीत फिरणारे लोक व अशा वर्णनाची महिला मिळते का ? हे शोधण्यासाठी इतरही पथके पाठविली होती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला नंदुरबार शहरातील उड्डाणपुलाचे खाली एका कॉलमच्या आडोश्याला एक महिला बसलेली दिसली त्या महिलेचे वर्णन संशयीत महिलेच्या वर्णनाशी मिळते जुळते असल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तिला ताब्यात घेतले संशयीत महिलेला ताब्यात घेवून पोलीस अधीक्षक कार्यालय येथे आणून विचारपुस केली असता ती सुरुवातीस उडवा उडवीची उत्तरे देत होती म्हणून नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी स्वत : महिला पोलीस अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखा यांचे समक्ष संशयीत महिलेकडे कौशल्यपूर्वक सखोल विचारपूस केली असता तिच्याकडून अतिशय धक्कादायक माहिती समोर आली दि . ३ जुलै २०२२ रोजी संशयीत महिला ही तिचा नवरा रणजित पवार तसेच रविंद्र पावरा , मुकेश आर्य असे चलथान ( गुजरात ) येथून नंदुरबार येथे येत असतांना चलथान परिसरात संशयीत महिला हिस एक लहान मुलगी रडतांना दिसल्यावर संशयीत महिलेने व तिच्या सोबत असणान्या इसमांनी त्या लहान मुलीस संगनमताने उचलून घेतले व रेल्वेने नंदुरबार येथे बेकायदेशीर हेतूने आणले ,
नंदुरबार येथे आल्यानंतर संशयीत महिलेसह तिच्या सोबतच्या सर्वांनी मिळून रेल्वे स्टेशन जवळील कंजरवाडा परीसरात दारुचे सेवन केले . त्यांनतर रात्रीच्या वेळेस त्यांनी पुन्हा दारुचे सेवन केले व ते रेल्वे स्टेशनकडे निघाले सोबत असलेली ती चिमुकली झोपी गेली होती . रात्रीच्या वेळेस रणजित , रविंद्र , मुकेश यांनी त्या चिमुकलीला रेल्वे कॉलनी परिसरातील रेल्वे नियंत्रण कक्षाच्या लगत असलेल्या एका सेफ्टी टँक जवळील भागात आणले . त्यावेळी संशयीत महिला ही रस्त्यावर उभी राहून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी उभी होती . संशयीत महिला हिचा पती रणजित पवार याने त्या अनोळखी दोन वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केला .
जिवाच्या आकांताने रडणान्या त्या चिमुकलीचा रणजित याने गळा आवळून खून केला . त्यानंतर सर्वांनी मिळून तिचे प्रेत रेल्वे कॉलनी परिसरातील नियंत्रण कक्षाच्या लगत असलेल्या एका सेफ्टी टँकमध्ये फेकून दिले होते . संशयीत महिला हिस ताब्यात घेतल्यानंतर विचारपुस दरम्यान तिच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर संशयीत महिलेचा पती रणजित दिना पवार हा नवापूर येथे असल्याची माहिती मिळाली त्यावरून नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांना रणजित यास ताब्यात घेण्याचे आदेश दिले . त्या वरुन नवापुर पोलीसांनी रणजित यास .नवापूर शहरातून ताब्यात घेतले तर मुकेश नारायण आर्य व रविंद्र विजय पावरा यांना नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी नंदुरबार शहरातून ताब्यात घेतले . संशयीत महिलेने दिलेल्या माहितीची रणजित मुकेश व रविंद्र यांच्याकडून खात्री केली असता त्यांनी देखील गुन्ह्यात सहभागी असल्याची कबुली दिली आहे . या प्रकरणी संशयीत महिला , रणजित दिना पवार रा . नागसर ता . नवापुर , मुकेश नारायण आर्य , रा . धनोरा ता . सेंधवा जि . बडवाणी मध्य प्रदेश , रविद्र विजय गावरा रा . चिकलटी फाटा , शेलकुवी ता . धडगांव यांना गुन्ह्याच्या पुढील तपास कामात ताब्यात घेण्यात आलेले आहे . स्थानिक गुन्हे शाखा व नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अमलदार यांनी अतिशय क्लिष्ट व संवेदनशील अशा गुन्ह्याचा छडा लावला , म्हणून नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर पाटील अपर पोलीस अधीक्षक नंदुरबार विजय पवार यांनी स्थानिक गुन्हे शाखा व नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या पथकाचे अभिनंदन केले .
सदर चिमुकलीची ओळख न पटल्याने तिची ओळख पटविण्यासाठी व चिमुकलांच्या नातेवाईकांचा लवकरात लवकर शोध घेण्यासाठी ३ पथके गुजरात राज्यात रवाना केलेली आहे . तसेच यामध्ये आणखी काही आरोपीतांचा सहभाग आहे अगर कसे ? या बाबत पडताळणी करण्यात येत आहे असे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी सांगितले . सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील , अपर पोलीस अधीक्षक विजय पवार , उप विभागीय पोलीस अधीकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर , नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर व पोलीस उप निरीक्षक हेमंत मोहिते तसेच स्थानिक गुन्हे शाखा व नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाच्या अमलदारांनी केली आहे .