धुळे, दि. 4 (जिमाका वृत्तसेवा) : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत ‘घरोघरी तिरंगा’ अर्थात ‘हर घर तिरंगा’ अभियानाचे सूक्ष्म नियोजन करीत प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातून उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि गटविकास अधिकारी, नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांची ऑनलाइन बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज (रोहयो), जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश मोरे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी सांगितले, भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त केंद्र सरकार आणि राज्य शासनातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत ‘घरोघरी तिरंगा’ अभियान राबविण्यात येईल. या अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक घरावर तिरंगा ध्वज फडकावयाचा आहे. शासकीय, निमशासकीय व खासगी आस्थापनांनी सुद्धा या कालावधीत घर, इमारत, कार्यालयांवर राष्ट्रध्वज उभारावयाचा आहे. त्यासाठी शासकीय यंत्रणा, स्थानिक स्वराज्य संस्थांनी नागरिकांना प्रोत्साहन द्यावे. जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळे, प्राचीन स्थळांचे सुशोभिकरण करावे. घर, इमारतींवर ध्वज फडकविण्यासाठी तो गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार असावा. ध्वज फडकविताना ध्वजसंहितेचे उल्लंघन होणार नाही याचीही दक्षता घ्यावी.
धुळे जिल्ह्यात 75 अमृत सरोवरांची निर्मिती करावयाची आहे. आतापर्यंत 20 अमृत सरोवरांची निर्मिती पूर्णत्वास आली आहे. या तलावांच्या काठावर स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करावयाचे आहे. या पार्श्वभूमीवर तहसीलदार, गटविकास अधिकाऱ्यांनी संबंधित तलावांची पाहणी करून ध्वजारोहणाचे नियोजन करावे. तसेच ध्वजारोहण कालावधीत पूर्ण वेळ एका कर्मचाऱ्याची नियुक्ती करावी. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकाऱ्यांनी आपापल्या भागात विविध कार्यक्रमांचे नियोजन करावे. तसेच नागरिकांमध्ये जनजागृती करावी. आतापर्यंत आयोजित कार्यक्रमांची छायाचित्रे, चित्रफिती, उपक्रमांची माहिती शासनाच्या संकेतस्थळावर अद्ययावत करावी. त्याचा दैनंदिन अहवाल सायंकाळी सादर करावा, असेही जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी सांगितले.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रक्तदान शिबिर, ऐतिहासिक वारसा स्थळांची स्वच्छता, विद्यार्थ्यांची प्रभातफेरी, स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबांची भेट, विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन, वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम आदी उपक्रम राबविण्यात आले असून आगामी काळात विविध उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे तहसीलदार गायत्री सैंदाणे (धुळे ग्रामीण), सुनील सैंदाणे (शिंदखेडा), आबा महाजन (शिरपूर), गटविकास अधिकारी जगन सूर्यवंशी (साक्री), आर. डी. वाघ (धुळे), संजय सोनवणे (शिरपूर), साक्री नगरपंचायतीचे मुख्याधिकारी देवेंद्रसिंह परदेशी यांनी सांगितले. उपजिल्हाधिकारी श्री. दाणेज, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मोरे यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त घ्यावयाचे उपक्रम याविषयी सविस्तर माहिती दिली.