कर्जत : जयेश जाधव
कर्जत कोरोना महामारीत जीवाची बाजी लावून काम करणारी आरोग्य यंत्रणा, पोलीस यंत्रणा आणि नगरपरिषद सफाई कर्मचारी, अधिकारी, कर्मचारी यांना राख्या बांधून शारदा मंदिर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी रक्षाबंधन सण साजरा केला व सामाजिक बांधीलकी जपली आहे.
रक्षाबंधन हा बहीण-भावाच्या नात्यातील प्रेम वृद्धिंगत करणारा सण आहे. समाजात अशीही काही माणसे आहेत, जी कोणत्याही नात्यात नसताना इतर अनेक लोकांना विविध प्रकारे सुरक्षित ठेवत असतात. त्यांचे रक्षण करत असतात, अशा लोकांमुळे आपण सुरक्षित आहोत.
कोरोना प्रादुर्भावाच्या काळात या गोष्टी आपल्याला प्रकर्षाने जाणवल्या सेवाभावी वृत्तीचे व्रत स्वीकारलेल्या समाजातील आरोग्यसेवक, पोलीस कर्मचारी आणि नगरपरिषद सफाई कर्मचारी या घटकांचे आभार मानून त्यांच्या कार्याप्रती आपली संवेदना व आदर व्यक्त करता यावा, यासाठी शारदा मंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका अंजली किसवे, छाया नगरकर, धनश्री कानडे, कुमारी अस्मिता ठाणगे आदी शिक्षक व विद्यार्थिनींनी अधिकारी आणि कर्मचारी यांना राख्या बांधल्या.