सुतारवाडी (हरिचंद्र महाडिक )
मुंबई-गोवा हायवे महामार्ग ६६ वरील वरसगाव पेट्रोल पंपासमोर पहिल्याच पावसापासून अनेक खड्ड्यांनी रिंगण केल्यामुळे येथून ये-जा करणाऱ्या वाहन चालकांना आपला जिव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.याच खड्ड्यातून प्रवास करतांना एक तरुण कामावरून घरी परतत असतांना टूव्हीलर वरून पडून मरण पावला तर काही दिवसापूर्वी गोवे येथील एक तरुण याच खड्ड्यातून प्रवास करतांना गंभीर जखमी झाला होता.यामुळे अजून किती प्रवाश्यांचा बळी गेल्यावर किंवा किती जण गंभीर जखमी झाल्यावर हे खड्डे भरले जातील असा खडा सवाल प्रवाशी वर्गातून केला जात आहे.
या बाबत ही समस्या वृत्तपत्रांनी संबंधित खात्याच्या निदर्शनास आणून देखील येथील खड्डे न बुजवता प्रवासी व वाहतूक करणाऱ्यांच्या जीवाशी हे खाते खेळत असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर खड्ड्यांनी रिंगण केले असून चारचाकी सह दुचाकी आणि तीन चाकी वाहनांना मोठी कसरत करावी लागत असल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
मुंबई – गोवा महामार्गावरील वरसगांव पेट्रोल पंपापासून भिरा फाट्यापर्यंत अतिशय भयानक खड्डे पडले आहेत कि या खड्ड्यातून रास्ताच गायब झाला आहे. या महामार्गवरून मुंबई-गोवा, भिरा फाटा ते ताम्हिणी मार्गी पुणे असा चारी बाजूकडील प्रवाशी प्रवास करीत असतात तसेच याच मार्गावर रेल्वेची रोरो सेवा सुरु आहे यामुळे या मार्गावर छोटया वाहनापासून अवजड वाहनांची सतत वर्दळ सुरु असते. यामुळे या खड्ड्यातून मार्ग काढतांना सतत वाहतूक कोंडी निर्माण होते. वरसगांव पेट्रोल पंपाच्या बाजूनी दुसरा रस्ता झाला परंतु या रस्त्यावर असणाऱ्या मोरीचे काम १२ वर्षा पासून तसाच पडून आहे या मोरीचे काम झाले असते तर थोडया प्रमाणात वाहतूक कोंडी व अपघाताचे प्रमाण कमी झाले असते परंतु सुस्त झालेला बांधकाम खाते याला काय कळणार !
रात्रीच्या वेळी वाहन चालकांना येथील खड्डे दिसत नाहीत. त्यामुळे मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे. दुचाकी वाहन चालकाला तर पाय जमिनीला टेकावे लागत असून मोठ्या शिताफिने रात्रीच्या वेळी भर पावसात मार्ग काढावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने प्रवाशांच्या अपघाताची वाट न पाहता त्वरित खड्डे भरून होणारा धोका टाळावा अशी मागणी प्रवाशी वर्गातून होत आहे.
प्रतिक्रिया
वरसगांव पेट्रोल पंपासमोर अनेक दिवसापासून प्रचंड जीवघेणे खड्डे पडलेले आहेत याविषयी पत्रकारांनी वृत्तपत्राच्या माध्यमातून अनेक वेळा आवाज उठवला परंतु सुस्त झालेले शासन,लोकप्रतिनिधी यांच्या दुर्लक्षमुळे एका तरुणांला जिव गमवाया लागला तर गोवे येथील तरुण गंभीर जखमी झाला.डांबर मिश्रीत खडी खड्ड्यात टाकून तो खड्डा भरत नसेल तर त्या खड्ड्याचा उपाय म्हणून खड्डयाचा भाग खोदून सिमेंट काँक्रेटने भरावा तरच तो टिकेल अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तुकाराम सानप यांनी केली आहे.