प्रतिकात्मक
DPT News Network मुंबईः स्वत:च्या अल्पवयीन मुलीनेच बलात्काराचा खोटा आरोप लावल्याने पित्याला जवळपास साडेपाच वर्षे तुरुंगात काढावे लागले आणि अखेर खटल्याच्या सुनावणीअंती विशेष पोक्सो न्यायालयाने निर्दोष ठरवल्यानंतर त्याची तुरुंगातून सुटका झाली, असा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला आहे.
मुलीचे एका मुलासोबत प्रेमसंबंध होते आणि ते वडिलांना रुचत नसल्याने मुलीने त्यांच्यावरच बलात्काराचे खोटे आरोप लावून अडकवले. मुलीची मानसिक स्थिती ठिक नव्हती, असेही खटल्याच्या सुनावणीदरम्यान समोर आले. ‘एका मुलासोबत जवळचे संबंध होते आणि त्याच्यासाठी आभूषणे व सौंदर्य प्रसाधने वापरली की, वडिलांना आवडायचे नाही. ते नेहमी माझ्याविषयी काही तरी ग्रह करून असायचे,’ असे पीडितेने तिच्या साक्षीत सांगितले. परिणामी ‘या प्रकरणातील सर्व वस्तुस्थिती व पुरावे लक्षात घेता केवळ पीडितेच्या एकमेव साक्षीवर विसंबून चालणार नाही. सरकारी पक्षाने आरोपीविरोधात लावलेला बलात्काराचा आरोप संशयास्पद वाटतो. त्याच्याविरुद्धचा गुन्हा निर्विवाद सिद्ध होण्यासाठी सरकारी पक्षाने पुरेसे पुरावे दिलेले नाहीत. त्यामुळे तो निर्दोष सुटकेसाठी पात्र ठरतो’, असे अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीकांत भोसले यांनी आपल्या निर्णयात स्पष्ट करतानाच आरोपीची तुरुंगातून तत्काळ सुटका होण्याचा आदेश जारी करावा, असेही निर्देश संबंधित प्रशासनाला दिले.
नेमके काय होते आरोप?
‘पीडित मुलगी ही १४ वर्षांची व सरकारी शाळेत सातवीत शिकत होती. ती तिचे वडील, आई आणि दोन लहान बहिणी, दोन भावांसोबत राहत होती. ५ मार्च २०१७ रोजी तिने तिच्या वर्ग शिक्षिकेकडे तिच्यावरील लैंगिक अत्याचाराची माहिती दिली. माझ्या वडिलांनी माझ्यावर जानेवारी २०१६ ते ५ मार्च २०१७ या कालावधीत घरातच दर महिन्याला तीन-चार वेळा बलात्कार केला, अशी माहिती तिने दिली. त्यामुळे शिक्षिकेने एका स्वयंसेवी संघटनेला याची माहिती दिल्यानंतर अंधेरीतील डी. एन. नगर पोलिसांत तक्रार देण्यात आली. त्यानंतर महिला पोलिस उपनिरीक्षकाने शाळेत जाऊन पीडित मुलीचा व शिक्षिकेचा जबाब नोंदवला. तसेच पीडितेची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर १६ मार्च २०१७ रोजी एफआयआर नोंदवून १८ मार्च २०१७ रोजी तिच्या वडिलांना अटक केली. तसेच तपासाअंती आरोपपत्र दाखल केले.
आरोप कसा ठरला खोटा?
‘मुलीच्या शारीरिक तपासणीत वैद्यकीय अधिकाऱ्यांना शारीरिक संबंधांबाबतचे आवश्यक पुरावे आढळले नाही. पोलिसांनी आरोपी वडिलांविरोधात एफआयआर दाखल केल्यानंतर पीडित मुलीला बाल निरीक्षणगृहात ठेवण्यात आले. तेव्हापासून ती कुटुंबासोबत राहण्यास गेलीच नाही. बालगृहात असताना तिने काही चिठ्ठ्या लिहिल्या होत्या. त्यात रात्री झोपेत असताना आपल्याला कोणी तरी स्पर्श करत आहे वगैरे आभास व्हायचा आणि दु:स्वप्न पडायची, असे तिने म्हटले. या साऱ्या पार्श्वभूमीवर, मुलीची मानसिक स्थिती ठिक नसल्याचे दिसते. पीडितेचे एका मुलासोबत असलेले संबंध वडिलांना रुचत नसल्याने आणि त्यावरून त्यांनी तिला मारहाण केल्याने तिने त्यांना लक्ष्य केले, अशी साक्ष कुटुंबातील सदस्यांनी दिली. या साऱ्यावरून सरकारी पक्षाने आरोपीविरोधात बलात्काराचा केलेला आरोप संशयास्पद वाटतो’, असे निरीक्षण न्यायाधीशांनी निर्णयात नोंदवले.