*( प्रतिनिधी :- रमजान मुलाणी )*
सांगली :- गेल्या वर्षभरापासून सांगली, मिरजेसह जिल्ह्यात धुमाकूळ घालून पोलिस यंत्रणेला आव्हान देत अनेक घरफोड्या केलेल्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मंगळवारी यश आले. अटक केलेल्यांमध्ये मोबाईल भैरू पवार (वय १९), इकबाल भैरू पवार (४०, दोघेही रा. करंजवडे, ता. वाळवा), घायल सरपंच्या काळे (४६, चिकुर्डे, ता. वाळवा) व प्रवीण राजा शिंदे (३१, गणेशवाडी-वडूज, ता. खटाव, जि. सातारा) यांचा समावेश आहे. कारंदवाडी (ता. वाळवा) येथे छापा टाकून टोळीतील चौघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून जिल्ह्यातील ५० घरफोड्या उघडकीस आल्या आहेत. या गुन्ह्यातील सोन्या- चांदीचे दागिने व ९५ हजारांची रोकड असा १६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आतापर्यंतची गुन्हे अन्वेषणची हि सर्वात मोठी कारवाई आहे, अशी माहिती जिल्हा पोलिसप्रमुख दीक्षित गेडाम यांनी पत्रकार परिषदेत दिली. गेल्या काही महिन्यांपासून घरफोडीच्या गुन्ह्यात प्रचंड वाढ झाली आहे. याची जिल्हा पोलिसप्रमुख गेडाम यांनी दखल घेऊन गुन्हे अन्वेषणच्या पथकाला या गुन्ह्यांचा छडा लावण्याचे आदेश दिले होते. पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांचे पथक टोळीच्या मागावर होते. पथकातील सहाय्यक निरीक्षक संग्राम निशानदार, हवालदार चेतन महाजन, संदीप नलवडे व विनायक सुतार यांना कारंदवाडीत गेल्या काही दिवसांपासून चोरी करणारी टोळी आश्रयाला असल्याची माहिती मिळाली. पथकाने कारंदवाडीत छापा टाकून चौघांना अटक केली. टोळीतील चौघेही चोरलेल्या ऐवजाची लगेच वाटणी करून घेत होते. त्यांच्याकडून अडीचशे ग्रॅम सोन्याचे दागिने, दीड किलो चांदीचे दागिने, व ९५ हजाराची रोकड, दोन दुचाकी असा एकूण १६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक निरीक्षक प्रशांत निशानदार, भगवान पालवे, दीपड गायकवाड, अरूण औताडे, मेघराज रूपनर, दीपक गायकवाड, संदीप नलवडे, नागेश खरात, सचिन धोत्रे, कुबेर खोत, सुनील लोखंडे, आर्यन देशिंगकर, प्रशांत माळी, सधीर गोरे, निलेश कदम, हेमंत ओमासे, ऋषिकेश सदामते, संकेत कानडे, सुनील जाधव, विनायक सुतार, सोहेल कार्तियानी, ऋतुराज होळकर, प्रकाश पाटील, कॅप्टन गंडवाडे यांनी या कारवाईत सहभाग घेतला. पोलिसप्रमुख गेडाम यांनी पथकाच्या या कामगिरीचे कौतुक केले.