DPT News Network इगतपुरी : तालुक्यातील मुंबई-आग्रा महामार्गावरील पाडळी देशमुख शिवारात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने बाराचाकी ट्रक आणि विदेशी दारू असा एकूण ९० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे…
याबाबत अधिक माहिती अशी की, पाडळी देशमुख येथील हॉटेल पवनजवळ गस्त घालून वाहने तपासणी करत असतांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला एम एच ४० वाय ४४६७ बाराचाकी ट्रकमध्ये गोवा राज्यात विक्रीची परवानगी असणारी विदेशी दारू सापडली.
यात १५ हजार ३२२ विदेशी दारूच्या बाटल्यासह बाराचाकी ट्रक असा एकुण ८९ लाख ९३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ट्रकचा चालक सचिन बाळासाहेब भोसले (२९) रा. पोखरापूर ता. मोहोळ जि. सोलापूर या संशयिताला अटक केली आहे.
दरम्यान, ही कारवाई विभागीय उपआयुक्त अर्जुन ओहोळ, जिल्हा अधिक्षक शशिकांत गर्जे, उपअधीक्षक हर्षवर्धन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथक १ चे निरीक्षक जयराम जाखेरे, दुय्यम निरीक्षक पी. बी. ठाकूर, राहुल राऊळ, रोहित केरीपाळे, एम. आर. तेलंगे, जवान सुनील दिघोळे, विजेंद्र चव्हाण, धनराज पवार, एम.पी.भोये, राहुल पवार, गोकुळ परदेशी, किरण कदम यांनी केली.