मुंबई : मुंबईत एका नाल्यात महिलेचा जवळपास अर्धवट कुजलेला मृतदेह आढळून आला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. मुंबईत कुर्ला पूर्व भागात नेहरूनगरमधील एका नाल्यात पोत्यामध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. या महिलेचे हात आणि पाय दोरीने बांधल्याचे समोर आले आहे. बुधवारी सकाळी हा प्रकार समोर आला.
महिलेचे हातपाय बांधून तिला नाल्यात फेकल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. महिलेची आधी हत्या करण्यात आली. महिलेचे हातपाय बांधून तिचा मृतदेह गोणीत भरून नाल्यात फेकण्यात आला. मृत्यूचं कारण शोधण्यासाठी मृतदेह पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
स्थानिक नागरिकांना नाल्यात एक संशयास्पद गोणी आढळून आली. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. नेहरूनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तपासासाठी महिलेच्या मृतदेहाचे फोटो इतर पोलीस ठाण्यांमध्ये पाठवले आहेत. ही महिला कोण आहे? याचा तपास पोलीस करत आहेत.