DPT NEWS Network
धुळे – केंद्र व राज्य सरकार प्रशासनामध्ये सुशासन यावं यासाठी अनेक उपक्रम राबवत असते. वेळोवेळी कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना प्रशिक्षणही दिले जाते. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून जनतेला मिळणाऱ्या सेवा सुविधांमध्ये सुधारणा होण्यास मदत होते. त्यातून सुशासन प्राप्तीचे उद्दिष्ट गाठता येते. हाच उदात्त हेतू समोर ठेवून नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रोलर डेव्हलपमेंट अँड पंचायतराज हैदराबाद यांच्यावतीने प्रवीण प्रशिक्षकांची निवड करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातून अशा 12 प्रवीण प्रशिक्षकांची निवड सुशासनाचे प्रशिक्षण देण्यासाठी करण्यात आली आहे. यात उत्तर महाराष्ट्रातून अॅड कृष्णा मोरे यांची निवड करण्यात आली आहे.
अॅड कृष्णा मोरे यांनी माहिती अधिकार, नागरी हक्क, महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनिमय आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम अशा कायद्याचा विशेष अभ्यास केला आहे. यशदा सारख्या जागतिक मान्यताप्राप्त संस्थेमध्ये त्यांनी प्रशिक्षण पूर्ण करत लौकिक मिळवला आहे. समाजातील वंचित, उपेक्षित, पीडित घटकांना शासनात तसेच प्रशासनात येणाऱ्या अडीअडचणी सोडवण्यासाठी अॅड मोरे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या या निवडीबद्दल धुळ्यातील विविध सामाजिक संघटनांनी स्वागत केला असून, या जबाबदारीला उत्तम प्रकारे न्याय देण्याचा प्रयत्न करेल असे अॅड कृष्णा मोरे यांनी सांगितला आहे.