DPT NEWS NETWORK ✍️. प्रतिनिधी – अकील शहा
साक्री : ४८ महाराष्ट्र बटालियनच्या अंतर्गत सि गो पाटील महाविद्यालयात एनसीसी विभागामार्फत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. साक्री सेक्टर मधील सि गो पाटील महाविद्यालय साक्री व आ मा पाटील महाविद्यालय पिंपळनेर या दोन्ही महाविद्यालयातील एकूण २२ एनसीसी छात्र सैनिकांनी रक्तदान केले.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व ७४ व्या राष्ट्रीय छात्र सेना स्थापन दिनानिमित्त आज शासकीय वैद्यकीय रुग्णालय धुळे यांच्या सहकार्यातून सदर रक्तदान शिबिर संपन्न झाले. यामध्ये रक्त संक्रमण अधिकारी डॉ.राजेश ठाकूर, समाजसेवा अधीक्षक चंदुलाल साठे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ रवींद्र पवार, हंसराज बागुल व श्रीमती शीतल वाघोदे, अधिपरिचारक अक्षय माळी, प्रयोगशाळा परिचर अजय डोंगरे यांचा समावेश होता.
अनेक मोठ्या शस्त्रक्रिया किंवा गंभीर परिस्थितीत रक्तदानामुळे अनेकांना जीवनदान मिळत असते. म्हणूनच रक्तदान हे श्रेष्ठदान ठरते. असे प्रतिपादन रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र अहिरे यांनी केले. एनसीसी विभागामार्फत देश प्रेमाची आवड निर्माण करणारे विविध कार्यक्रम राबविले जातात. त्यातून देशाप्रती आदर, निष्ठा व प्रेम असणारे साहसी युवक तयार केले जातात. रक्तदान हा देखील समाजसेवा व राष्ट्रसेवेचा एक भाग आहे. या भावनेतून छात्र सैनिकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.
सदर रक्तदान शिबिरासाठी ४८ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल पराग कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे आयोजन व संचलन एनसीसी अधिकारी डॉ. भुषण अहिरराव यांनी केले. प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.अनंत पाटील, कॅप्टन पी एन शिंदे, प्राध्यापक वर्ग व छात्र सैनिक उपस्थित होते.