नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

दर्शन पोलीस टाईम दि.02.01.2023 संपादकीय…………………………………. नवा सूर्योदय
नकारात्मकता टाळता येणार नाही पण सकारात्मक घटनांचे अवलोकन करत समाजाला सातत्याने काहीतरी समाज हितपयोगी द्यावे हा विचार मांडणे माध्यमांसाठी निकडीचे ठरते.


अगदी नित्यनियमाने सूर्योदय होतोच पण नववर्षाचा पहिला दिवस हा काही नवीन उत्साह घेऊन येणारा असतो. त्यामुळे नव्या वर्षाचा पहिला दिवस आणि त्यादिवशी होणारा सूर्योदय काही वेगळाच असतो हे कोण नाकारेल? दिवसामागून दिवस जात असतात काही मनासारखं घडतं तर काही विपरीत! मग माणूस सरत्या वर्षाचा हिशेब मांडून नव्या वर्षाचा अदमास घेऊ पाहतो. स्वत:ला पुन्हा नव्याने जोखू पाहतो. किमान एवढ्यासाठी तरी आजचा दिवस तरी खासच….असं स्वत:च्या आत डोकावून बघण्याला काळवेळाची काही गरज नाही पण निमित्त असलं की मग काय? माणसाच्या मनात असलेली आशा महत्त्वाची. जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन महत्त्वाचा तशीच सकारात्मकता देखील!
दर्शन पोलीस टाईम च्या वाचकांच्या हाती अंक पडेल तेव्हा वर्षाचा दुसरा दिवस उगवलेला असेल. सरलेल्या वर्षाच्या चांगल्या वाईट आठवणींसह नववर्षाच्या स्वागत समारंभातून हळूहळू आपण सगळेच पूर्वपदावर येऊन दैनंदिन जीवनात व्यग्र होत जाऊ. तसाच समाजजीवनाचा आरसा असलेली माध्यमं देखील काही सकारात्मक आणि बऱ्याचशा नकारात्मक बातम्या वाचक/प्रेक्षकांपर्यंत घेऊन येतील. असे असले तरीही नवीन वर्षाची सुरुवात मात्र सकारत्मक लेखाने करावीशी वाटते यातूनच समाजाला सकारात्मक वातावरणाची किती गरज आहे हे लक्षात येते.
साधारणत: अग्रलेखाची जागा म्हणजे टीका-टिपण्णी, चुकीच्या गोष्टी जगासमोर मांडणे, सरकारच्या कामकाजाचे वाभाडे काढणे आणि वाईट काम करणाऱ्या लोकांची लक्तरे वेशीवर टांगणे असेच आहे असे सांगितले तरी वावगे ठरणार नाही. कधी तरी एखाद्या सकारात्मक घटनेला अग्रलेखात स्थान मिळते. असे असले तरीही जे काही वाईट आहे ते जगासमोर मांडणे हे माध्यमांचे कर्तव्य आहे याची जाण सर्व माध्यमकर्मी बाळगत असतात. सध्या सकारात्मक बातम्या द्या असा धोशा काही धूर्त लोकांकडून नेहमीच लावलेला बघायला मिळतो. वरवर त्यात काही चुकीचे देखील वाटत नाही. पण केवळ सकारात्मक बातम्याच दाखवल्या तर समाजातील वाईट घटना चहाट्यावर आणायच्या कुणी? याचा देखील संतुलितपणे विचार व्हायला हवा.
एकंदरीत नकारात्मकता टाळता येणार नाही पण सकारात्मक घटनांचे अवलोकन करत समाजाला सातत्याने काहीतरी समाज हितपयोगी द्यावे हा विचार मांडणे माध्यमांसाठी निकडीचे ठरते. नूतन वर्ष हे अनेक अर्थांनी खास आहे. विशेषत: फेब्रुवारी महिन्यात येणारा अर्थसंकल्प! कारण केंद्र सरकारचा या पाच वर्षातील पूर्ण म्हणावा असा हा शेवटचा अर्थसंकल्प होय. पुढचे वर्ष हे निवडणुकांचे वर्ष असेल. तेव्हा प्रत्येक नागरिकाच्या मनात आपल्या पदरी काय पडेल याची उत्सुकता ही प्रत्येकालाच असेल. तसेच येत्या वर्षात ९ राज्यांच्या निवडणुका असतील. भारतातील मोठा पक्ष असलेला भारतीय जनता पक्ष निर्णायक विजयासाठी तर कॉंग्रेस अस्तित्वासाठी आणि वेगात मार्गक्रमण करणारा आम आदमी पक्ष आपला पक्ष विस्तार कसा करतो हे या वर्षात बघायला मिळेल. ही झाली राजकीय बाजू! सध्या भारत उत्कर्षाच्या दिशेने वाटचाल करतो आहे का? हा वादविवादाचा प्रश्न असेल पण विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत भारताची वाटचाल नक्कीच आश्वासक आहे. २०२३ मध्ये ५ जी तंत्रज्ञान देशभरात उपलब्ध होईल. सध्याच्या ४ जी च्या दहा पट वेगवान असलेले ५ जी आपल्या सर्वांच्या जीवनावर प्रभाव टाकणारे असेल. असाच तंत्रज्ञानाचा विस्तार अजून एका क्षेत्रात होतो आहे ते क्षेत्र म्हणजे वाहन क्षेत्र. पारंपारिक पेट्रोल डीझेल इंजिनावर चालणारी वाहने आता विजेवर देखील धावू लागली आहेत. २०२२ हे वर्ष त्यादृष्टीने पायाभरणीचे होते. विजेवर चालणाऱ्या वाहनांसाठी पायाभुत सुविधा उभारणी करण्यात आता वेग दिसू लागला आहे. तेव्हा या वर्षांत मोठ्या प्रमाणात ‘इव्ही’ अर्थात इलेक्ट्रिक वाहने रस्त्यावर धावतांना दिसतील.
अजून एका क्षेत्रात आपण आपली घौडदौड चालूच ठेवणार आहोत ते म्हणजे लोकसंख्यावाढ. भारत या वर्षांत चीनला मागे टाकून जगातील सर्वांत मोठ्या लोकसंख्येचा देश झालेला असेल. लोकसंख्येच्या वाढत्या बोजाने आपल्या देशासमोर अनेक समस्या उभ्या ठाकल्या आहेत. त्यासंदर्भात अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून तज्ज्ञ व्यक्ती आपले म्हणणे मांडत आल्याचे बघायला मिळते. मात्र आपण लोकसंख्या वाढीच्या या भस्मासुराला आजवर आवर घालू शकलेलो नाही. त्यामुळे पायाभुत सुविधा ते गुन्हेगारीपर्यंत सर्वत्र त्याचे दुष्परिणाम दिसतात. या मोठ्या लोकसंख्येच्या प्रश्नाला दुसरी एक बाजू देखील आहे. यांमुळे आपल्या देशाकडे मनुष्यबळ विपुल प्रमाणात उपलब्ध आहे. जी अर्थातच आपली शक्ती आहे. मात्र जर त्यांना आपण पर्यायाने शासन चांगले आरोग्य, शिक्षण आणि पायाभुत सुविधा देऊ शकले नाही तर मात्र आपली ही शक्तीच आपली दुखरी बाजू ठरते. तेव्हा नवीन वर्षांत कोविड मुळे प्रलंबित असलेली जनगणना होऊ घातली आहे तेव्हा या सर्व प्रश्नांचा उहापोह होईलच.
यांसह केंद्र सरकार वाहतूक आणि दळणवळण क्षेत्राच्या विकासासाठी मोठा निधी खर्च करते आहे. त्यामुळे महामार्ग, रेल्वे विकास या वर्षात अजून नवीन उंची गाठेल. वेगाच्या या स्पर्धेत वाहतूक नियम पाळून जनतेने देखील आपले कर्तव्य पार पाडावे ही अपेक्षा मात्र विशेषत्वाने नमूद कराविशी वाटते. वार्तांकन करतांना घडणारे अनेक अपघात मनावर आघात करणारे असतात. गेल्या वर्षभरात अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेले दिसले. तेव्हा सुरक्षा मानकांचा सर्व स्तरावर गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे. यांसह मनोरंजन, क्रीडा, अध्यात्मिक क्षेत्रात अनेक मोठ्या घडामोडी अपेक्षित आहे. यांतून भारताची एक ‘सॉफ्ट पॉवर’ म्हणून दृढ ओळख विकसित होण्यास मदत होईल.
तेव्हा नववर्षाच्या सुरुवातीला जुन्या घटनांमधून बोध घेण्याची आठवण करून देत चालू वर्षातील महत्त्वाच्या सकारात्मक घटनांचा आढावा घेणे हे ओघाने आलेच. त्याची तात्पुरता पूर्तता करत दर्शन पोलीस टाईम च्या सर्व वाचक, प्रतिनिधी, जाहिरातदार, वितरक आणि हितचिंतकांना नूतन वर्षाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
1:34 am, January 14, 2025
temperature icon 19°C
साफ आकाश
Humidity 43 %
Wind 11 Km/h
Wind Gust: 17 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:10 am
Sunset: 6:09 pm
Translate »
error: Content is protected !!