DPT NEWS NETWORK ✍️ प्रतिनिधी: मनोहर पाटील
धुळे : उत्तरप्रदेशातील मजुराला मारहाण करीत कोणत्या तरी हत्याराने डोक्यात मारून त्याचा खून करण्यात आला. आज सकाळी धुळे शहरातील श्रीराम पेट्रोल पंपाच्या शेजारी सार्वजनिक शौचालयाच्या मागील बाजुस त्याचा मृतदेह अर्धनग्नावस्थेत आढळून आला. जवळचे त्याचे आधारकार्डही मिळून आले होते. याप्रकरणी अज्ञात आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजयकुमार झिन्नत गौतम (वय 45 रा. मसजिदिया, पिंपरी ता. सोहरगड, जि. सिध्दार्थ नगर पो.ठाणे. सोहरतगड, उत्तरप्रदेश व ह.मु चांडक कॉम्पलेक्स, भंगारबाजार, चाळीसगाव रोड, धुळे) असे मयताचे नाव आहे. दि. 1 रोजी रात्री 9 ते दि. 2 रोजी दुपारी बारा वाजेपुर्वी अज्ञात व्यक्तीने काहीतरी कारणावरून कोणत्या तरी हत्याराने त्यांच्या डोक्यावर वार केले. तसेच मारहाण करीत त्याचा खून केला. आज सकाळी ही घटना लक्षात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिक्षक संजय बारकुंड, सहाय्यक पोलिस अधिक्षक एस ऋषीकेश रेड्डी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, धुळे शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आनंद कोकरे व सपोनि दादासाहेब पाटील यांच्यासह शोध पथकाने घटनास्थळी भेट देत पाहणी केली.
याबाबत मयताचा शालक बुध्दराम बिपत गौतम (वय 48 रा. भैसावा ता. सोहरतगड, उत्तरप्रदेश ह.मु चांडक कॉम्पलेक्स भंगार बाजार) याने शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीवर भांदवि कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक आनंद कोकरे हे करीत आहेत.
दरम्यान, मयत विजयकुमार हा दोन महिन्यापासून धुळे येथे आलेला होता. भंगार बाजारात तो हमालीची काम करीत होता. मृतदेह आढळून आलेल्या परिसरात नशा करणारे अनेक लोक असून त्यातील कुणीतरी त्यांच्या खिशातून पैसे काढून अथवा अनैतिक संबंधातून त्याचा खून केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.