प्रतिनिधी
प्रविण चव्हाण
नंदुरबार -: चोरीची वाहने विकण्यासाठी आलेल्या एका चोरट्यांला
सापळा रचून नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखे ने जेरबंद केले आहे. या चोरट्यांकडून 1 लाख 03 हजार रुपये किंमतीच्या 4 मोटार सायकल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
दुचाकी वाहने चोरी करणारा एक चोरटा शहादयात चोरीची वाहने विकण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपींला अटक केली.
याबाबत अधिक माहिती अशी कि, नंदुरबार पोलीस अधीक्षक पाटील यांनी गुन्हे बैठकीत मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यांचा गुन्हे आढावा घेतला असता, नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे हद्दीत मोटर सायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्याअनुषंगाने मोटर सायकल चोरीच्या गुन्ह्यांचा गांभीर्याने तपास करुन मोटर सायकल चोरीचे गुन्ह्यातील सक्रीय गुन्हेगारांवर कारवाई करणे बाबत नंदुरबार पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी निर्देश गुन्हे बैठकीत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना दिले.
पो. निरीक्षक किरणकुमार खेडकर यांनी नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे अंतर्गत चोरी झालेल्या मोटार सायकल चोरीच्या पध्द्तीचा अभ्यास करुन वारंवार चोरी होणारे ठिकाण, वेळ, दिवस किंवा चोरी होणारी विशेष कंपनीची मोटार सायकल यांची माहिती घेवुन रेकॉर्ड वरील,जेल मधुन सुटुन आलेल्या मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यातील गुन्हेगारांवर तसेच ज्या ठिकाणावरुन जास्त प्रमाणात मोटर सायकल चोरीस जातात त्याठिकाणी पाळत ठेवुन होते. तसेच आपले खबरी मार्फत माहिती घेवुन मोटर सायकल चोरांचा शोध घेत होते.
दिनांक 06 जानेवारी 2023 रोजी नंदुरबार जिल्ह्या पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, शहादा शहरातील जुनी भाजी मंडी परिसरात एक इसम कागदपत्र नसलेले मोटर सायकल कमी किंमतीत विकत आहेत अशी बातमी मिळाल्याने, सदरची माहिती त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना सांगितली. पो. निरीक्षक खेडकर यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे 01 पथक करुन त्यांना योग्य ते नियोजन करुन सापळा लावण्याचे आदेश देवून पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करणे बाबत सुचना दिल्या.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ शहादा शहरातील जुनी भाजी मंडी परीसरात जावून खात्री केली असता एका टपरी जवळ एक इसम एका विना नंबर प्लेट असलेल्या मोटार सायकलसह दिसून संशयास्पद हालचाली करतांना दिसून आला. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक त्यांच्याकडे जात असतांना संशयीत इसमाने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु. पथकाने त्यास ताब्यात घेतले. ताब्यात घेण्यात आलेल्या संशयीत अनिल नरपत वसावे (22) रा. सरी पो. मोलगी ता. अक्कलकुवा जि. नंदुरबार . त्याच्या ताब्यात असलेल्या मोटर सायकल बाबत अधिक विचारपुस केली असता त्याने सांगितले की, सदरची मोटार सायकल त्याने सुमारे 2 ते 3 दिवसापूर्वी शहादा शहरातील राजपाल वाईन शॉपच्या मागे एका घरासमोरुन चोरी केल्याचे सांगितले. त्याबाबत शहादा पोलीस ठाण्याचे गुन्हे अभिलेखाची पडताळणी केली असता सदर मोटार सायकल बाबत शहादा पोलीस ठाणे गु.र.नं. 04/2023 भा.द.वि. कलम 379 प्रमाणे गुन्हा नोंद आहे.
ताब्यात घेण्यात आलेला आरोपी अनिल नरपत वसावे याचेविरुध्द् यापूर्वी देखील मालमत्तेविरुध्द्चे गुन्हे दाखल असल्याचे समजून आले. त्याने धडगांव, मोलगी परिसरातून आणखी तीन मोटार सायकल चोरलेल्या असून चोरी केलेल्या मोटार सायकली शहादा शहरातील नवीन बस स्थानकाच्या मागे काटेरी झुडपांमध्ये लपवून ठेवलेल्या आहेत बाबत सविस्तर माहिती दिल्याने तेथून 88 हजार रुपये किमतीच्या 03 असा मोटार सायकली ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत.
त्याबाबत, धडगांव पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 03/2022 भा.द.वि. कलम 379,
मोलगी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 01/2022 भा.द.वि. कलम 379 गुन्हे दाखल आहेत.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीकडून एकुण 1 लाख 03 हजार रुपये किमतीच्या 04 मोटार सायकली हस्तगत करुन 03 मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत. तसेच ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीतांकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ही कामगिरी नंदुरबार पोलीस अधीक्षक, पी.आर.पाटील, अपर पोलीस अधिक्षक निलेश तांबे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, सहा.पो. निरीक्षक संदीप पाटील, सजन वाघ, मुकेश तावडे, पुरुषोत्तम सोनार, मोहन ढमढेरे, अभिमन्यु गावीत, दिपक न्हावी यांच्या पथकाने केली आहे.