DPT NEWS NETWORK ✍️. प्रतिनिधी – मनोहर गोरगल्ले
लोणी : लोणी खेडेगावांमधील लोणी मॕरेथॉन २०२३ मोठ्या उत्साहात संपन्न झाली. सकाळी सहा वाजल्यापासून २५०० आबालवृद्ध धावपटूंनी या स्पर्धेत सहभाग घेऊन मोठ्या आनंदाने ही स्पर्धा पूर्ण करून चांगल्या आरोग्याचा संदेश समाजाला दिला आहे. झुंबा नृत्यप्रकाराने आणि पोलीस बँडच्या वाद्यवृंदाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. याप्रसंगी झी वाहिनीवरील सारेगमप या कार्यक्रमातील प्रख्यात बालगायिका ज्ञानेश्वरी गाडगे आणि स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते या मालिकेतील अभिनेत्री राधा सागर हे उपस्थित होते. माजी विद्यार्थी विकास प्रबोधिनी लोणी, पुनीत बालन ग्रुप पुणे आणि माणिकचंद अॉक्झिरीच ,फ्री रनर्स ग्रुप पुणे हे या मॕरेथॉनचे प्रायोजक होते.
३ किमी,५ किमी, १० किमी या तीन प्रकारात ही स्पर्धा भैरवनाथ प्रशाला लोणी खडकवाडी आणि द्रोणागिरी मार्गे धामणी व परत लोणी प्रशाला या मार्गाने संपन्न झाली. सदर उपक्रमामध्ये लोणी खडकवाडी वाळुंज नगर रानमळा धामणी शिरदाळे पहाडधरा वडगाव पीर मांदळ वाडी पेठ अवसरी निरगुडसर पारगाव पोंदेवाडी सविंदणे कानूर मेसाई केंदूर पाबळ या ठिकाणी वरील अकरा वर्षे ते पंचाहत्तर वर्षांपर्यंतचे शालेय मुले व मुली तसेच पुरुष व महिला अशा गटातून स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. सहभागी स्पर्धकांना प्रोत्साहन पर रोख बक्षीस , पदक,सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक धावपटूला टी शर्ट, पदक आणि प्रमाणपत्र देण्यात आले.सर्व धावपटूंसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या विविध भागातून या स्पर्धेसाठी धावपटू सहभागी झाले होते.गुजरात,लातूर, कोल्हापूर,जुन्नर या भागातूनही स्पर्धक आलेले होते. आणि विशेष म्हणजे या उपक्रमामध्ये तीस दिव्यांग स्पर्धकही सहभागी झाले होते.
या उपक्रमामध्ये महाराष्ट्र राज्याचे गृहविभागाचे सहसचिव कैलास गायकवाड , पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे मुख्य अधीक्षक अमोल तांबे, ,माजी विद्यार्थी विकास प्रबोधिनीचे अध्यक्ष उदयसिंह वाळुंज, तसेच विविध पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक त्यांचे सहकारी ,प्रबोधिनीचे खजिनदार बाळासाहेब गायकवाड , माजी सरपंच सावळा भाऊ नाईक , सरपंच ऊर्मिला धुमाळ ,पिंटु पडवळ, अशोक आदक हे उपस्थित होते.मॕरेथॉन यशस्वी करण्यासाठी गावातील सर्व मंडळे आणि युवकांनी आणि ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले.याप्रसंगी पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रबोधिनीचे सचिव डॉ.अविनाश वाळुंज आणि सदस्य नवनीत सिनलकर यांनी केले .