राजकीय सारीपटावर ज्या काही खेळ्या सध्या खेळल्या जात आहेत त्या अविश्वसनीय अशाच आहेत. त्याचे ताजे उदाहरण म्हणजे पक्षातील फुटीनंतर आठ महिन्यांनी उद्धव ठाकरे यांना पक्षाचे नाव आणि चिन्ह दोन्ही गमवावे लागले आहे. ‘ठाकरेंविना शिवसेना’ हे अकल्पित घडलं आहे आणि अद्याप अनेक लढाया प्रलंबित आहेत. त्यातल्या काही न्यायालयात लढल्या जातील आणि बाकी निवडणुकीच्या मैदानात! दूरचित्रवाणी वरच्या लुटूपूटू च्या लढाया तर जोरात सुरु आहेत. तिथे कुणी हार खाणार नाही.
आधी राज्यसभा आणि नंतर विधानपरिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची नामुष्की झाली आणि नंतर शिवसेना फुटली. महाराष्ट्रात सत्तांतर झाले. मात्र यासाठी जी व्युहरचना आखली गेली त्याला तोड काही उद्धव ठाकरेंना सापडवता आली नाही. शिंदेंच्या पाठीशी उभी असलेली ‘महाशक्ती’ प्रत्येक डाव निगुतीने खेळत होती आणि प्रत्येक पावलागणिक उद्धव ठाकरे हतबल होतांना दिसले. एक तर मान्य करावेच लागेल की बुद्धिबळाच्या या डावात उद्धव ठाकरे मागे पडले त्याचीच परिणीती म्हणून आज त्यांना पक्षाचे नाव आणि चिन्ह दोन्ही गमवावे लागले.
निवडणूक आयोगाने निकाल तर दिला मात्र त्यानंतर उद्धव ठाकरे गटाकडून ज्या काही प्रतिक्रिया आल्या त्यातही ‘प्रगल्भता’ काही आढळली नाही. निवडणूक आयोगावर खालच्या पातळीवर टीका करून उद्धव ठाकरे यांनी काय साध्य केले? आपल्या बाजूने निकाल आला की न्यायालय, आयोग चांगले, मग सत्याचा विजय आणि विरोधात निकाल आला की सर्व विकले गेले आहेत. किमान उद्धव ठाकरे यांनी तरी याबाबत संयम दाखवायला हवा होता. कारण त्यांच्या नंतर तर अंधारच आहे. या चिखलफेकीने काही साध्य तर होत नाही शिवाय खर तर त्यांना हा निकाल काही इतका अनपेक्षित नव्हता. याबाबतीत त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडून नक्कीच शिकायला हवे. त्यांची प्रतिक्रिया संतुलित आणि संकटात सुद्धा आपलं तोल ढळू न देता परिस्थितीच आकलन कसं कराव याचा वस्तुपाठ घालून देणारी होती.
मराठी माणसांच्या न्यायहक्कासाठी स्थापन झालेली शिवसेना बाळासाहेबांच्या नेतृत्वात ‘एक घाव दोन तुकडे’ या चालीने लढत राहिली. ते जिंकले, हरले मात्र सर्वसामान्यांसाठी लढत राहिले याचे अवघ्या मराठीजनांना कौतुक होते. त्यातूनच ‘ठाकरे’ या नावाला एक वलय प्राप्त झाले. काळ पुढे सरकत गेला आणि मराठी सोबत हिंदुत्व जोडत शिवसेना अजून फोफावली अगदी राज्याच्या सत्तापदावर आरूढ होईपर्यंत पक्ष बलवान झाला. बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेनेचे नेतृत्व आले. त्यांचा राजकारणाचा बाज वेगळा होता. शांत आणि संयमी असलेले उद्धव रांगड्या शिवसैनिकांनी मनापासून स्विकारले असे चित्र अगदी आतापर्यंत दिसत होते. शिवसेनेला फूट काही नवी नाही. शिवसेनेत अशी वादळ अनेक आली पण शिवसेनेचा गड आपली आब सांभाळून होता. मात्र शिंदेंच हे बंड उद्धव यांच्या नेतृत्वात सर्व काही आलबेल होत हे चित्र पार पुसून टाकणारं ठरलं.
बाळासाहेबांचे निधन होण्याचा आणि भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय पातळीवर उभारी धरण्याचा काळ तसा जवळपास एकच! मात्र मग पुढे या दोन मित्रपक्षांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरु झाली. २०१४ च्या विधानसभेच्या निवडणुकीपासून अभेद्य वाटणारी भाजप आणि शिवसेना युती अविश्वासाच्या वावटळात सापडली आणि त्याची परिणीती २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काय झाली हा इतिहास परत उगाळण्यात काही अर्थ नाही. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे सत्तेत आले खरे मात्र त्याची किंमत आता ते चुकवतांना दिसत आहेत. सत्ता तर गेलीच पण पक्ष देखील हातातून निसटला.
निवडणूक आयोगाने आपला निकाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पारड्यात टाकला आहे. अजून सर्वोच्च न्यायालयातील निकाल येणे बाकी आहे. पण हा डाव जिंकून एकनाथ शिंदे गटाने मुसंडी मारली आहे हे नक्की. मुख्यमंत्री पदाला एकनाथ शिंदे चांगलेच सरावले आहेत. मात्र ज्या सहजतेने जनतेने त्यांना मुख्यमंत्री म्हणून स्विकारले त्या तुलनेत ‘शिवसेनाप्रमुख’ म्हणून एकनाथ शिंदे यांना कितपत स्विकारले जाईल ही शंका आहेच. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील सहकाऱ्यांनी आता जरी सुटकेचा निश्वास टाकला असेल तरी अद्याप जनतेच्या मैदानात त्यांना आपल्याला सिद्ध करावे लागेल आणि ते इतके सोपे नाही याची जाणीव त्यांना नक्की असेल असे समजूया. कारण ‘ठाकरेंविना शिवसेना’ लोकांच्या पचनी इतक्या सहजासहजी काही पडणार नाही. उद्धव आणि त्यांच्या जोडीला आदित्य यांनी जनतेची सहानुभूती मिळवण्यात कुठलीही कसर सोडणार नाहीत हे त्यांच्या आजवरच्या डावपेचांवरून लक्षात येते. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाविषयी लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झाल्याचे अनेक प्रसंग आजवर आले मात्र ‘ठाकरे’ म्हणून त्यांना मिळालेले प्रेम निर्विवाद आहे.
तेव्हा जनतेच्या मैदानातील लढाई अनेक अर्थाने महत्त्वपूर्ण आहे. ठाकरेंना आपले अस्तित्व दाखविणे गरजेचे आहे. विजय पराभवाच्या पलीकडे आपला राज्याच्या राजकारणातील असलेला ‘प्रभाव’ उद्धव ठाकरेंना सिद्ध करायचा आहे तो सुद्धा ‘शिवसेना’ आणि ‘’धनुष्यबाण’ या नाव आणि चिन्हाशिवाय! दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्री पद, पक्षाचे नाव आणि चिन्ह सर्व काही आहे मात्र जनतेच्या मनात त्यांचे स्थान काय आहे हे तेव्हाच कळेल जेव्हा मतदारराजाने आपला कौल दिला असेल. तेव्हा मात्र आता चालू असलेल्या या कागदी लढाया व्यर्थ ठरतील आणि जनतेने ‘निकाल’ लावलेला असेल.