६ फेब्रुवारीला कोकणातील महानगरी टाईम्स चे पत्रकार शशिकांत वारीसे यांचा अपघात झाला असा बनाव रचून घातपात लपविण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र सुदैवाने हा बनाव फार काळ टिकला नाही. परंतु यांत दुर्दैव म्हणजे ग्रामीण स्तरावर काम करणारा एक पत्रकार आपल्या पेशामुळे जीवाला मुकला. मग नंतर एका पत्रकाराचा दिवसाढवळ्या खून झाला या बातमीने सर्वत्र संतापाची लाट उसळली. आजही त्याचे पडसाद सर्वदूर उमटता आहेत. जर या प्रकरणाच्या खोलात जाण्याचा प्रयत्न केला तर त्यातून निष्पन्न होणाऱ्या बाबी सध्या राजकीय फायद्यासाठी सुरु असलेल्या चिखलफेकीपेक्षा अधिक गंभीर आहे.
ज्या दिवशी शशिकांत वारीसे यांची हत्या झाली त्याच दिवशी त्यांनी पंतप्रधान-मुख्यमंत्री यांच्या फलकांवर गुन्हेगारांचे छायाचित्र या अर्थाची बातमी दिली होती आणि बरोबर त्याच दिवशी दुपारी त्यांची हत्या होते आणि ती पण त्याच गुन्हेगाराच्या वाहनाच्या धडकेने! यांतून सर्वात पहिला निष्कर्ष काय निघतो तर तो म्हणजे गुन्हेगारांना कायद्याचे भय उरलेले नाही. त्याचे कारण म्हणजे सरकारमध्ये मग ते कुठल्याही पक्षाचे असो अशा गुन्हेगारांचे राजकीय पक्षांच्या नेत्यांशी संबंध हे असतातच. जर नेते आणि गुन्हेगार यांच्यात सख्य असेल तर गुन्हेगारांना कायद्याचे भय कसे राहील. तेव्हा सरकारने जनतेत विश्वास निर्माण करणे आणि गुन्हेगारांवर वचक बसविणे किती आवश्यक आहे हे सर्वप्रथम निदर्शनास येते.
या प्रकरणातील आरोपी पंढरीनाथ आंबेरकर ही व्यवसायाने आंब्यांचे व्यावसायिक आहेत. काही वर्षापूर्वी ते प्रवासी वाहनांच्या व्यवसायात आले. शिवाय सर्वात महत्वाचे म्हणजे ते जमिन खरेदी विक्री व्यवसायात देखील आहे. कोकणात अनेक उद्योग प्रकल्प प्रस्तावित आहेत. त्यासाठी सरकारी जमीन अधिग्रहण झाल्यानंतर आजूबाजूच्या जमिनी विकत घेण्यासाठी अनेक मोठे व्यवहार या भागात सध्या होतांना दिसता आहेत. कोकणचा विकास अद्याप तरी दृष्टीक्षेपात नाही मात्र या तथाकथित विकास प्रकल्पांमुळे गुन्हेगारीला जी चालना मिळाली आहे ती कोकणच्या शांततेवर घाव घालणारी ठरू नये ही अपेक्षा सर्वसामान्य लोकांनी का ठेवू नये? पूर्वीच्या काळी “भूखंडाचे श्रीखंड” या बातम्या वाचायला मिळायच्या आज या भूमाफियांचे प्रस्थ इतके वाढले आहे की हे वादळ जणू सर्वसामान्यांच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे.
सध्या कोकणात प्रकल्प यावे की येऊ नये यांवर दोन गट पडले आहेत. आरोपी पंढरीनाथ आंबेरकर हा समर्थक गटातला असून त्यानिमित्ताने संघटनात्मक कामात देखील त्याचा सहभाग दिसून येतो. शिवाय त्यांनी यापूर्वी लोकसभेची निवडणूक देखील लढवली असल्याचे दिसते. इतकेच काय पंढरीनाथ आंबेरकर हे काही पहिल्यांदा गुन्हेगार म्हणून समोर आलेले नाहीत. याआधी देखील त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. ज्यांत गंभीर गुन्ह्यांचा देखील समावेश होतो. अशी राजकीय आणि गुन्हेगारी क्षेत्राशी संबंधित पार्श्वभूमी असलेला माणूस समाजाचे प्रतिनिधित्व करत असेल तर तेथील राजकारणाचा पोत काय असेल ते नक्कीच लक्षात येण्यासारखे आहे.
या प्रकरणात अजून एक चिंतेची बाब म्हणजे स्थानिकांचे याविषयी असलेले अळी मिळी गुपचिळी असे धोरण! याचे कारण म्हणजे ज्या ठिकाणी हा गुन्हा घडला त्याला कुणी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाही, आजूबाजूचे सीसीटीव्ही बंद आहेत या बतावण्या त्या भागात काय दहशत असेल याचेच निदर्शक आहे. खर म्हणजे यानिमित्ताने समाजाने देखील आत्मनिरीक्षण करणे अगत्य्पूर्ण ठरेल. केवळ स्वत:चे आणि कुटुंबाचे हित न पाहता समाजाच्या हितासाठी गुन्हेगारांविरुद्ध खंबीरपणे उभे राहणे किती गरजेचे आहे हेच या ठिकाणी दिसून येते. जो पत्रकार समाजाचे प्रबोधन व्हावे यासाठी हयातभर पत्रकारिता करतो त्याची परतफेड आशा रीतीने व्हावी? हे नक्कीच मनाला खिन्न करणारे तसेच कुठल्याही प्रागतिक समाजाला शोभणारे नाही.
४५ वर्षीय शशिकांत वारीसे गेल्या वीस वर्षांपासून पत्रकारितेशी संबंधित होते. तेव्हा रत्नागिरी जिल्हा आणि राजापूर तालुका असे कार्यक्षेत्र असलेल्या स्वर्गवासी वारीसे यांनी आपले मोलाचे योगदान या ठिकाणी दिल्याचे आपल्या समोर आहे आणि त्यांना बदल्यात मिळाले काय तर मृत्यू! ही आपल्या समाजाची एक शोकांतिकाच म्हणावी लागेल. त्यांच्या मागे त्यांची वयोवृद्ध आई आणि एक तरुण मुलगा आहे ज्याने आपले मातृछत्र लहान वयातच गमावले होते. आज त्यांना सरकारी मदत देण्याची घोषणा सरकारने केली आहे तसेच निपक्ष चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत पण याने त्यांच्या जखमा भरून निघतील का या प्रश्नाचे उत्तर ठामपणे नाही असेच द्यावे लागेल अन्यथा अशीच एखादी वाईट बातमी आपल्या पुढ्यात आली असेल. या हत्या प्रकरणात पत्रकार, सामान्य जनता यांच्या भावना तीव्र आहेत. सरकारने नि:पक्ष चौकशी पूर्ण करावी आणि मुख्य म्हणजे वेळेत ही चौकशी करून आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे हीच पत्रकार शशिकांत वारीसे यांना श्रद्धांजली ठरेल. दर्शन पोलीस टाईम च्या वतीने पत्रकार शशिकांत वारीसे यांना भावपूर्ण श्रद्धांजली!