नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

संपादकीय……………

दि. 27.02.2023

निमित्तमात्र पोटनिवडणूक!

सुरु असलेले हे राजकारण सामान्य माणसाला मात्र गृहीत धरतांना दिसते ही सामान्य माणसाच्या मनात असलेली ठसठस मतपेटीतून बाहेर येईल का?

पुणे शहरातील कसबा मतदारसंघ आणि पिंपरी चिंचवड मतदारसंघातील पोटनिवडणूक घोषित झाली आणि आधीच गढूळ झालेले राजकारण अधिक गढूळ होण्यास निमित्त मिळाले. काही महिन्यांपूर्वी दोन आमदारांच्या निधनाने या जागा रिक्त झाल्या होत्या. पोटनिवडणूक असली की फार काही उत्साह त्यात असतो असे आजवर तरी दिसले नाही. मात्र हा आता भूतकाळ झालेला आहे असे म्हणता येते. आता प्रत्येक निवडणूक ही प्रतिष्ठेची असते आणि जणू काही यांमुळे आपल्याला जिंकल्यावर सत्तेचा अमरपट्टा मिळणार आहे अशा अविर्भावात या निवडणुका लढविल्या जातात.
राजकारणातील उणीदुणी आता गौप्यस्फोट आणि वार-पलटवार,टोला यां नावाखाली सातत्याने दूरचित्रवाहिनीच्या सहाय्याने आपल्यासमोर २४ तास येत असतात आणि जनता देखील या खेळात कळत नकळतपणे ओढली जाते. यांतून ना राज्याचे कुठले प्रश्न सुटणार असतात ना सर्वसामान्यांच्या पदरात काही पडणार असते. तरी देखील हा राजकारणाचा घाणेरडा झालेला खेळ लढला जातो आहे.
ताज्या पोटनिवडणुकीत देखील पैसे वाटप, जातीपातीचे, धर्माचे असे सर्व प्रकारचे राजकारण सातत्याने सामोरे येते आहे. जे आडमार्गाने नेहमीच चालत आले तरी इतक्या उघडपणे नजरेस येते आहे. पुणे तिथे काय उणे या म्हणीचा प्रत्यय या अर्थाने देखील येईल याचे कदाचित खऱ्या पुणेकरांना दु:ख असू शकते पण आता उपयोग काय? जे डोळ्यासमोर घडते आहे ते पाहणे नव्हे निमुटपणे पाहणे आजच्या परिस्थितीत जणू काही सामान्य झाले आहे.
ही निवडणूक इतक्या हिरीरीने लढविण्यामागे अनेक कारणे आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणाची कूस आता बदलू लागल्याचे एव्हाना जाणकारांच्या लक्षात आलेच असेल. त्यात पुढच्या निवडणुकीला अवकाश असल्याचे जरी भासत असले तरी २०२४ ची विधानसभेची निवडणूक मुदत पूर्ण झाल्यावरच होईल याची शाश्वती कुणालाच नाही. तेव्हा रिंगणात आपलं पारडं जड असाव या दृष्टीने सर्वांचेच प्रयत्न सुरु आहेत. सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपले स्थान बळकट करून मुख्यमंत्र्यांच्या प्रभावळीत आपले नाव अजून जास्त काळ घेतले जावे असे वाटणे जरी स्वाभाविक वाटत असले तरी भारतीय जनता पक्षाला ते परवडणारे नाही. सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना परत मुख्यमंत्री व्हायचे आहे. अर्थात त्यांच्यासाठी ते एवढे सोपे नाही. कारण अर्थात त्यांचा सहयोगी पक्ष शिवसेना हेच आहे. तेव्हा एका बाजूला युती आणि दुसऱ्या बाजूला विरोधी पक्ष असे अग्निदिव्य पार पाडत त्यांना सत्तेचा सोपान गाठायचा आहे.
अजित पवार यांची मुख्यमंत्री पदाची महत्त्वाकांक्षा कधी लपून राहिली नाही. २०१९ मध्ये अनपेक्षितपणे सत्तेची सावली प्राप्त झाल्यावर त्यांनी नियोजनबद्ध रीतीने आपली रणनीती आखत त्यादृष्टीने अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली. मात्र अडीच वर्षात शिवसेना फुटली तरी अप्रत्यक्षपणे का होईना त्याचा फायदा राष्ट्रवादीला होईल याची अजित पवारांना पुरेशी जाण आहे. परिणामी त्या दृष्टीने त्यांची वाटचाल सुरु आहे. म्हणूनच पिंपरी चिंचवड च्या पोटनिवडणुकीसाठी ते चांगल्या प्रकारे मेहनत करत आहेत. अर्थात त्यांचा मार्ग काही निष्कंटक नाही. जयंत पाटील आणि अन्य काही जणांच्या कितीही इच्छा असल्या तरी त्यांना अजित पवार भारी ठरतील पण सुप्रिया सुळे यांच काय? हा प्रश्न विचारल्यावर राष्ट्रवादीचा कार्यकर्ता नाही म्हंटल तरी विचारमग्न होतो. नुकतेच रंगलेले पोस्टर युद्ध हा त्याचाच परिपाक होता. शरद पवारांसारखा मुरब्बी नेता असल्याने या प्रकरणाला फार फाटे फुटले नाही तरी असला काही प्रकार अस्तित्वात नाही असे छातीठोकपणे कुणी सांगायला सामोरे येत नाही. एवढे तरी राजकीय निरीक्षकांच्या नजरेतून सुटलेले नाही.
उद्धव ठाकरे सध्या अस्तित्वाची लढाई खेळत आहेत. जनतेची सहानुभूती त्यांना काही प्रमाणात मिळत असली तरी त्या सहानुभूतीचे रुपांतर मतांमध्ये करणे एवढे सोपे नाही. याची जाणीव त्यांना देखील असेलच. तेव्हा उद्धव ठाकरे सध्या केवळ मुंबई मध्ये आपली ताकद आजमावतील अशी शक्यता दिसते आहे. मुंबईचा मोह शिवसेनेला पूर्वीपासून आहे मात्र त्यामुळे राज्य संघटनेकडे दुर्लक्ष होईल याची काळजी ते करतांना दिसत नाही. तेव्हा ही लढाई काही कोणासाठीच सोपी नाही एवढे नक्की.
राजकारणातील प्रमुख पक्ष म्हणून यांचा विचार केला तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वंचित बहुजन आघाडी, एमआयएम यांसह अनेक छोटे पक्ष या लढाईत आपल्या परीने रंग भरतील. तरी या पक्षांना भरीव काही यश मिळेल अशी काही सुतराम शक्यता दिसत नाही. मात्र राजकारणात काहीही होऊ शकते तेव्हा त्यांच्या लढण्याला कारण देखील आहे.
अशा पद्धतीने सुरु असलेले हे राजकारण सामान्य माणसाला मात्र गृहीत धरतांना दिसते ही सामान्य माणसाच्या मनात असलेली ठसठस मतपेटीतून बाहेर येईल का? कदाचित यातूनच सध्याच्या राजकारणात निर्माण झालेली कोंडी फुटेल अशी आशा करता येईल. विधानपरिषदेनंतर आता पोटनिवडणुका या काय कल दाखवतात हे येत्या दोन दिवसात आपल्या समोर असेलच!

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
6:00 am, January 15, 2025
temperature icon 23°C
घनघोर बादल
Humidity 49 %
Wind 8 Km/h
Wind Gust: 17 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:10 am
Sunset: 6:09 pm
Translate »
error: Content is protected !!