DPT NEWS NETWORK 🗞️✍️
प्रतिनिधी: संदिप अहिरे
धुळे: धुळे शहरात देवपूर परिसरातील देवपूर पो. स्टे. एरियातील झेड.बी. पाटील महाविद्यालय परिसरतील व दत्त मंदिर परिसरातील कॅफे च्या नावाने सुरू असलेल्या प्रेमी युगलाना भेटण्याचे संशयास्पदरित्या सुरू असलेल्या अड्ड्यांवर (कॅफेंवर) देवपूर पोलिसांनी एकाच वेळी धाड टाकून मोठी कारवाई केली. यावेळी कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० महाविद्यालयीन तरुण-तरुणींना पोलिसांनी पकडले. तसेच कॅफे चालकांसह इतर नऊ जणांना ताब्यात घेतले आहे. पालकांना पोलीस ठाण्यात बोलावून, त्यांच्यासमोर समज देऊन मुला-मुलींची सुटका करण्यात आली.
दरम्यान, साखरपुडा झालेल्या भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात आल्याने चर्चेचा विषय झाला. सुरतचा नवरदेव धुळ्यातील आपल्या भावी पत्नीला भेटण्यासाठी आला होता. दोघेजण नेमके त्याच कॅफेत भेटले आणि पोलिसांची रेड झाली. पोलिसांनी त्यांना पकडून पोलीस ठाण्यात आणले. मुलीच्या घरच्यांची मात्र दोघांना सोडवण्यासाठी दिवसभर तारांबळ उडाली. त्या दोघांना सोडताना, यांचं लवकर उरकून टाका असा सल्ला पोलिसांनी दिल्यावर एकच हशा पिकला.
फ्रेंड गार्डन कॅफे, ग्रीन गार्डन कॅफे, एप्पल कॅफे, डिलाईट कॅफे, युथ कॅफे, विथ यु कॅफे आणि अन्य एक अशा सात कॅफेवर कारवाई झाली आहे. त्यांच्या चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे.
देवपूर पोलिसांची आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई असून या कारवाईचे सर्वसामान्यांनी स्वागत केले आहे. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही कारवाईचे कौतुक केले आहे. या कारवाईदरम्यान देवपूर पोलीस ठाण्याच्या बाहेर एकच गर्दी झाली होती. शुक्रवारी दिवसभर देवपूर पोलीस ठाण्याला यात्रेचे स्वरूप आले होते.
पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, आयपीएस रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मोतीराम निकम, एपीआय सचिन बेंद्रे, महिला पीएसआय सी. जे. शिरसाठ, पीएसआय इंदवे, हेड कॉन्स्टेबल कचवे, विजय जाधव, पोलीस नाईक देवरे, मुकेश वाघ, साळवे, थोरात, धोबी, खाटिक यांनी वेगवेगळ्या पथकात विभागून ही कारवाई केली.