DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी – प्रकाश चव्हाण
सोलापूर : महाराष्ट्र अजूनही काही गाव खेड्यांवर पाण्यासाठी भटकंती चालू आहे. तर काही शहरांमध्ये देखील दहा दहा बारा बारा दिवसात पालिकेचे पाणी येत आहे. त्यामुळे पाण्यासाठी सर्वांचीच धावपळ होत असते अशीच धावपळ करत असताना एक दहा वर्षाचा चिमुकला सोलापुरात विजेचा शॉक लागून मृत्युमुखी पडला. सोलापूरमध्ये मन सुन्न करणारी घटना घडली आहे. सोलापूरातील लष्कर विभागात ही दुर्दैवी घटना घडली आहे. चि. शांताराज तिल्लोर असे या घटनेत मृत पावलेल्या मुलाचे नाव आहे. शांताराज तिल्लोर याचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला आहे.
सोलापूरमध्ये उन्हाळ्यामुळे काही ठिकाणी पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. काही ठिकाणी 4 तर काही ठिकाणी 9 दिवसांनी पाणी येत आहे. घटनेच्या दिवशी लष्कर भागात मंगळवारी 9 दिवसांनी पाणी आले होते. त्यामुळे कमी दाबानं पाणी पुरवठा सुरू असल्यानं अनेक जण मोटार लावून घरातील पाणी घेतात. शांताराजच्या घरातही 35 फुटांवर वायर कनेक्शन लावून मोटारीनं पाणी भरण्यात येत होतं. यावेळी शांताराजनं पाणी भरण्यासाठी वायर कनेक्शन लावले, पण तो मेन स्विच बंद करण्याचे विसरला. त्यामुळे त्याला विजेचा जोरदार झटका बसला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
ही घटना घडली त्यावेळी शांताराजच्या अपंग आजीच घरी होत्या. त्याचा भाऊ पुण्याला गेला होता. तर त्याचे आई-वडील मोलमजुरी करत असल्याने ते मोलमजुरीसाठी बाहेर गेले होते. आपल्या डोळ्यादेखत नातू शॉक लागून कोसळल्याचे पाहताच आजीने मोठा आक्रोश केला. यानंतर आजूबाजूच्या लोकांनी हा आक्रोश ऐकून घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांनी शांताराजला छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलमध्ये दाखल केले मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही त्याअगोदरच त्याचा मृत्यू झाला होता.