DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी: भुवनेश दुसाने पाचोरा: पाचोरा तालुक्यातील बांबरुड गावातील शेतकऱ्याच्या पिककर्जाचा बोझा सातबा-याच्या उता-यावर लावण्यासाठी लाच स्वीकारणा-या खासगी इसमाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी रंगेहाथ पकडले आहे. सदर कारवाई पाचोरा तालुक्यातील बांबरुड गावात करण्यात आली असून यामध्ये भगवान दशरथ कुंभार ( वय-४४, रा. बांबरुड, ता. पाचोरा) असे लाचखोराचे नाव आहे. तक्रारदार यांची लासगाव शिवारात आईच्या नावे शेत गट क्र. १२८/ब/१ मध्ये ०.९१ हेक्टर आर चौरस मीटर क्षेत्र असलेली शेत जमीन आहे. या शेतजमिनीवर तक्रारदार यांच्या आईच्या नावे सामनेर गावातील बँक ऑफ बडोदाच्या शाखेकडून एक लाख ३० हजारांचे पीककर्ज मंजूर करण्यात आले आहे. या मंजूर पिककर्जाचा बोझा शेतजमिनीच्या सातबाराच्या उता-यावर घेण्यासाठी तक्रारदार बांबरुड तलाठी कार्यालयात गेले. तेव्हा कार्यालयात असलेल्या भगवान कुंभार याने तक्रारदारांना तलाठ्यांशी आपले चांगले संबंध आहेत. तेव्हा तुमच्या आईच्या नावे मंजूर झालेल्या पिककर्जाचा बोझा शेतजमिनीच्या सातबाराच्या उता-यावर लावून देतो असे सांगत तक्रारदारांकडून त्यांच्यासह आईच्या आधारकार्डाची झेरॉक्स व त्यांचे पासपोर्ट फोटो मागितले होते तसेच आईच्या नावे मंजूर झालेल्या पिककर्जाचा बोझा शेतजमिनीच्या सातबाराच्या उता-यावर लावण्यासाठी एक हजार ३६० रुपयांच्या लाचेची मागणी केली. ही लाच स्वीकारताना बुधवारी उपअधीक्षक शशिकांत पाटील, निरीक्षक एन. एन. जाधव, पोलीस नाईक ईश्वर धनगर, पोलीस शिपाई राकेश दुसाने यांनी भगवान कुंभार याला रंगेहाथ पकडले. त्याच्याविरुध्द पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.