DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- संजय गुरव
मंदाणे:- मंदाणे- शहाणा या राज्यमार्गावर मंदाणे-वडगांव गावादरम्यान एका चारचाकी क्रुझर वाहनाने जबर धडक दिल्याने शहाणे (ता.शहादा) येथील तरुण जागीच ठार झाल्याची घटना (ता.१८ जून)रोजी रविवारी संध्याकाळी घडली. या अपघात प्रकरणी क्रुझर गाडीच्या वाहन चालक विरुद्ध शहादा पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, मंदाणे-शहाणा राज्यमार्गावरील मंदाणे-वडगांव रस्त्यावरील एका वळणावर वडगांवकडून येणाऱ्या फोर्स कंपनीच्या क्रूझर (गाडी नं.एम.एच.-३९-जे-९९२२) वाहनाने शहाणा येथील रहिवाशी दिपक बुख्या सुळे (वय ३८) यास जबर धडक दिल्याने दिपक सुळे याचे जागीच निधन झाल्याने एकच खळबळ उडाली. मयत दिपक यांचा लहान मुलगा प्रमोद हा इयत्ता ८ वी ला नंदुरबार येथील एकलव्य विद्यालयात शिकत होता. शाळा सूरू झाल्याने मयत दिपक हा रविवारी सकाळी आपला मुलगा प्रमोद यास नंदुरबार येथील एकलव्य विद्यालयात सोडायला गेला. मुलाला सोडून दिपक हा एकटाच आपल्या होंडा कंपनीच्या शाईन मोटार सायकल (क्रमांक एम एच ३९-ए एल-७३०३) ने आपल्या शहाणा गावाकडे येण्यास निघाला.संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास तो मंदाणे कडून शहाणाकडे जात असताना मंदाणे-वडगांव रस्त्यावर वडगांवकडून येणाऱ्या वरील क्रमांकाच्या क्रुझर वाहनाने एका वळणार दिपक यास जोरदार धडक दिली. त्यात दिपक यास हातापायाला व डोक्याला जबर मार लागल्याने तो जागीच ठार झाला. धडक दिल्यानंतर वाहन चालक व वाहनातील असलेले काहीजण वाहन सोडून पसार झालेत. अपघातात मयत पावलेला व्यक्ती हा शहाणा येथील असल्याची वार्ता परिसरात पसरली. सदर घटनेची माहिती दीपकच्या परिवाराला मिळाल्याने परिवारातील सदस्यांनी आपल्या नातेवाईकांसह घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी शहादा व असलोद येथील पोलीस अधिकारी, कर्मचारी देखील घटनास्थळी पोहचले. घटनास्थळी पोहचल्यावर पोलिसांनी धडक दिलेल्या क्रुझर वाहना संबंधि माहिती मिळविली असता सदर वाहन हे शहादा तालुक्यातील भिलाली येथील असून वाहन चालक संतोष भटू पावरा हा गणोर येथील असल्याचे कळले.सदर घटनेची फिर्याद मयत दीपकचा भाऊ अविनाश बुख्या सुळे (रा.शहाणा) यांनी पोलिसांना दिली. त्यानुसार क्रूझर वाहनाचा वाहन चालक संतोष भटू पावरा (रा.गणोर ता.शहादा) याच्या विरोधात शहादा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत दिपक याच्या शरीरावर शहादा येथील ग्रामीण रुग्णालयात रात्री शवविच्छेदन करण्यात येऊन नातेवाईकांकडे मृतदेह सोपविण्यात आला. त्यानंतर रात्री उशिरा पर्यंत क्रूझर वाहन चालक संतोष भटू पावरा हा स्वतःहून शहादा पोलीस स्टेशनला जमा झाला. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली असलोद दूरक्षेत्राचे हवालदार अशोक कोळी हे करीत आहे.