आपला देश स्वतंत्र झाल्यापासून आजवर महाराष्ट्रात रस्त्यांचे जाळे चांगलेच विणले गेले आहे. याला कुठलाही संख्याशास्त्रीय संदर्भ नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सध्या ज्या खड्ड्यांच्या तक्रारी येत आहेत त्यावरून तरी हे निश्चितच सिद्ध होते. त्यासाठी सर्व राजकारण्यांचे कौतुक! आता इतके रस्ते केलेच आहेत तर त्यावर असलेले खड्डे बुजवण्याची शर्थ पण त्यांनी करायला हवी.
पावसाला जरी उशिरा सुरुवात झाली तरी राज्याचा काही भाग पावसाने झोडपला गेला आहे तर दुसऱ्या बाजूला काही भागात अद्याप देखील दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. मात्र रस्त्यांवरील खड्ड्यांनी असा कुठलाही दुजाभाव केला नाही. अगदी संततधार पावसाने देखील रस्त्यांची दैना झाल्याचे चित्र अवघा महाराष्ट्र पाहतो आहे, तिथे मुसळधार पावसाने रस्ते टिकले हेच सुदैव! पाऊस पडला की निसर्गाचे रुपडे पालटते आणि आपल्याला पाऊस येऊन ठेपल्याची जाणीव होते. निसर्गाचे अनुकरण सरकारने देखील केले आहे. रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले की समजावे पावसाळा आलाच!
या खड्ड्यांनी अनेकांचे जीव घेतले, अनेकांना कायमचे जायबंदी केले मात्र तरीही ये रे माझ्या मागल्या प्रमाणे दरवर्षी पाऊस आला की रस्त्यांवर खड्डे पडतातच. तंत्रज्ञान आता इतके पुढे निश्चितच गेले आहे की बारमाही रस्ते टिकतील या दर्जाचे रस्ते बनवणे शक्य आहे. मात्र आपली शोकांतिका ही आहे की, बनवलेला रस्ता टिकला नाही तर तो कंत्राटदार चोहीबाजुने प्रगती करतो आणि ज्या कंत्राटदाराने टिकाऊ रस्ता बनवला की तो कंत्राटदार त्याच्या व्यवसायात अपयशी ठरतो. यावरून या खड्ड्यांमागे नक्की कुठे पाणी मुरतय हे लक्षात येते.
रस्ते निर्मितीत भ्रष्टाचाराचे जे ग्रहण लागले आहे ते किती सरकारे बदलली तरी सरलेले नाही. भ्रष्टाचार मुक्तीच्या गमजा अनेक जण मारतात पण रस्त्यांचे प्राक्तन बघता ते त्यांना एक तर जमले नाही किंवा त्यांना तसे करायचे नाही हे लक्षात येते. आपल्या राजकारणाचा जीव या खड्डेमय रस्त्यात अडकला आहे. नियोजन शून्य पद्धतीने रस्ता करायचा, मग काहीतरी आठवल्यासारख करून परत खोदायचा आणि नंतर तात्पुरती मलमपट्टी केली तरी नागरिकांचे नशीब फळफळले असेच म्हणावे लागेल! हा बेबंदपणा जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातील रस्त्यांची दुरवस्था काही केल्या थांबणार नाही.
शहरी भागात काही ना काही कारणाने सतत रस्ते खोदले जातात, त्यात कधी गटारी, कधी पाईपलाईन, तर सार्वजनिक वाहतुकीचे अवाढव्य प्रकल्प असे ते काहीही असू शकते. त्यापायी जनतेला वर्षानुवर्षे त्रास सहन करावा लागतो. आम्ही जनतेसाठी काही तरी करतो आहोत ना मग त्यासाठी काही तरी त्रास होणारच असा अविर्भाव ठेऊन शासकीय यंत्रणा कामकाज करीत असतात. परंतु जर आधीच थोडे नियोजन केले तर जनतेला होणारा त्रास कमी होऊ शकेल. पण जेव्हा म्हणायला लोकोपयोगी कामे असतात पण त्याच्या केंद्रस्थानी जनता कुठे असते. सर्वशक्तिमान राजकारणी, शासकीय अधिकारी, कंत्राटदार यांची अभद्र युती आपल्या सोयीने सर्व काही पुढे रेटू पाहाते आणि त्यातूनच सार्वजनिक व्यवस्थेचा बोजवारा उडतो.
आज गल्लीपासून ते राज्यातील मोठमोठ्या महामार्गांवर खड्डे पडलेले आपण बघत आहोत. सरकार उत्तरं देण्याचे जे काही सोपस्कार पार पाडते त्यांत इतके हजार खड्डे बुजवले, तितके हजार खड्डे बुजवल्याचे दावे करते मात्र सामन्यांच्या रस्त्यावरचे खड्डे वर्षानुवर्षे तसेच असल्याचे आढळतात. सामान्य नागरिक बाहेर पडला की जीव मुठीत घेऊनच प्रवास करतो इतके खड्डयांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. शाळकरी मूले, गरोदर स्त्रिया, ज्येष्ठ नागरिक यांचा जीव तर अगदी मेटाकुटीला आलेला दिसतो. शहरे आता इतकी अवाढव्य झाली आहेत की छोट्या मुलांना देखील लांबचा प्रवास करून शाळा गाठावी लागते. मात्र सध्याच्या खड्डेमय रस्त्यांमुळे अशी अवस्था आहे की लहानगी मुले त्यांच्या शाळेच्या बसमध्ये तास न तास अडकून पडतात. सामान्य तर कुठेतरी आपले भोग म्हणून हे निशब्द सहन करतात. पण त्या लहानग्या मुलांचे काय? आघाड्या, युत्या एका रात्रीत बनता पण चांगल्या रस्त्यांना अद्याप मुहूर्त लागलेला नाही. त्यासाठी खूप दूरची काही तारीख दिली जाते. असे का?
रस्त्यांवरच्या या खड्ड्यांमुळे रहदारीच्या समस्येने अक्राळविक्राळ रूप धारण केले आहे. पोटासाठी भाकर हवी तर कष्ट आलेच पण तास न तास रहदारीत तिष्ठत राहणे याला काय म्हणावे? शास्त्रशुद्ध पद्धतीने रस्ता बनविणे अभियंत्यांना जमत नाही असे नाही पण इच्छाशक्ती हा आपला प्रांत नाही असे त्या अधिकाऱ्यापासून ते थेट उच्चपदस्थ नेत्यांपर्यंत सर्वांनी ठरवले असावे. या रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या शहर ते ग्रामीण, मुख्य रस्ते ते गल्लीतील रस्ते, सत्ताधारी ते विरोधक यांचे मतदारसंघ अशा प्रत्येक ठिकाणी आहे. आता त्यासाठी देखील जनआंदोलन उभे करावे लागेल असे दिसते. ती वेळ नक्कीच येऊन ठेपली आहे. जीवघेण्या खड्ड्यांची छायाचित्रे बघितली तरी आपण विकासाच्या दिशेने चाललो आहोत हा भ्रम दूर होतो. तेव्हा आपले सार्वजनिक जीवन अधिक दर्जेदार व्हावे असे वाटत असेल तर चांगले रस्ते ही त्याची एक महत्त्वपूर्ण खूण मानायला हवी. त्यामुळे आता तरी या रस्त्यांवरील खड्ड्यांना कायमचे गाडले जाण्यासाठी सर्व स्तरातून हालचाल व्हायला हवी.